डीसीसीतील आरोपींच्या हालचालींवर पोलिसांचे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2016 20:09 IST2016-07-12T20:09:37+5:302016-07-12T20:09:37+5:30
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बेकायदेशीर कर्ज वाटप प्रकरणातील तीन गुन्ह्यांचे आरोपपत्र पोलिसांनी सोमवारी न्यायालयात सादर केले.

डीसीसीतील आरोपींच्या हालचालींवर पोलिसांचे लक्ष
ऑनलाइन लोकमत
बीड, दि. 12 - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बेकायदेशीर कर्ज वाटप प्रकरणातील तीन गुन्ह्यांचे आरोपपत्र पोलिसांनी सोमवारी न्यायालयात सादर केले. तथापि, हे प्रकरण आता न्यायप्रविष्ट झाले असले तरी पोलिसांचा ससेमिरा सुटलेला नाही. आरोपींच्या बारीक- सारीक हालचालीवंर पोलिसांची करडी नजर आहे. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आ. अमरसिंह पंडित, खा. रजनी पाटील या विद्यमान लोकप्रतिनिधींसह १११ जण वाँटेड आहेत. यात जिल्हा बँकेच्या माजी संचालकांसह अन्य बड्या राजकीय नेत्यांचाही समावेश आहे.
विखे पाटील सहकारी साखर कारखाना, अंबा सहकारी साखर कारखाना व संत जगमित्र नागा सहकारी सूतगिरणी या संस्थांच्या संदर्भातील हे प्रकरण आहे. अनुक्रमे खा. रजनी पाटील, भाजपचे रमेश आडसकर, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या या संस्था आहेत. तिन्ही संस्थांचा मिळून ३२ कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्हार आहे. त्यामुळे राजकीय व सहकार वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष पथकामार्फत नव्याने झालेल्या तपासात ४०९ व ४०६ ही कलमे वाढली असून आरोपींची संख्याही वाढली आहेत. त्यामुळे गैरव्यवहाराचे आरोप असलेल्यांपुढील अडचणी वाढल्या आहेत.
कोणी सहलीवर, कोणी नातेवाईकांकडे !
या प्रकरणात एकूण १११ आरोपींचा समावेश आहे. जिल्हा बँकेच्या तत्कालीन संचालकांसह कर्जदार संस्थांचे संचालकही गोत्यात आहेत. शिवसेना वगळता सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी यात आरोपी आहेत. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे विदेश दौऱ्यावर असून रविवारपासूनच इतर आरोपी भूमिगत आहेत. कोणी सहलीवर गेले असून काहींनी नातेवाईकांकडे आश्रय घेतल्याचा पोलिसांना संशय आहे. अटक टाळण्यासाठी अनेकांनी आपले भ्रमणध्वनी बंद करुन संपर्काबाहेर राहणे पसंद केले आहे.
तीन गुन्ह्यांच्या तपासाचा प्रगीत अहवाल मंगळवारी खंडपीठात सादर करावयाचा होता; परंतु तारीख पुढे ढकलली आहे. आता खंडपीठाने आदेशीत केलेल्या तारखेला अहवाल सादर केला जाईल. आरोपींवर आमचे लक्ष आहे. ते आढळल्यास त्यांना न्यायालयासमोर हजर करु. -अनिल पारसकर पोलीस अधीक्षक, बीड.