लोकमत न्यूज नेटवर्क छत्रपती संभाजीनगर : जेव्हा मी तरुण आयपीएस अधिकारी होते, तेव्हा बोटावर मोजता येतील एवढेच पोलिस अधिकारी पैसे घेत होते. आता मात्र बोटावर मोजावे एवढेच लोक पैसे घेत नाहीत, अशी परिस्थिती आहे. या परिस्थितीला राजकारणी आणि जनता जबाबदार असल्याचे निवृत्त पोलिस महासंचालक डॉ. मीरा बोरवणकर-चड्डा म्हणाल्या.
मराठवाडा साहित्य परिषदेच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रविवारी अनंत भालेराव प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा यंदाचा अनंत भालेराव स्मृती पुरस्कार डॉ. मीरा बोरवणकर यांना निवृत्त न्या. सुनील देशमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मंचावर डॉ. सविता पानट, मंगेश पानट, हेमंत मिरखेलकर आणि संजीव कुलकर्णी यांची उपस्थिती होती. सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ आणि रोख ५० हजार रुपये असे या पुरस्काराची रक्कम पोलिस फाउंडेशनला पुरस्काराचे ५० हजार रुपये पोलिस फाउंडेशनला देत असल्याची व पुरस्कार महाराष्ट्र पोलिसांना समर्पित करीत असल्याची घोषणा बोरवणकर यांनी केली.
बोरवणकर म्हणाल्या, तरुणपणी महिला आहे, म्हणून मला पोलिस अधीक्षकपदी नेमणूक दिली जात नव्हती. आपल्यासोबतचे अन्य अधिकारी अधीक्षक होऊन तीन ते चार वर्षे झाली होती. तेव्हा आपण भांडून पोलिस अधीक्षकपदाची पोस्टिंग मागितली तेव्हा मला छत्रपती संभाजीनगर शहर मिळाले. आंतरराष्ट्रीय मानकानुसार १ लाख नागरिकांमागे २२० पोलिस असावेत. पण महाराष्ट्रात १६० पोलिस आहेत. ही यंत्रणा बदलणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.