झोपेत असताना पोलिसांनी सह्या घेतल्या, मनोज जरांगेंचा खळबळजनक आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2024 09:23 AM2024-01-26T09:23:35+5:302024-01-26T09:24:08+5:30

मुंबई दाखल होण्यापूर्वी आझाद मैदानावरुन पोलीस प्रशासन आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात वाद पेटला आहे. 

Police took signatures while sleeping, Manoj Jarang's sensational allegation | झोपेत असताना पोलिसांनी सह्या घेतल्या, मनोज जरांगेंचा खळबळजनक आरोप

झोपेत असताना पोलिसांनी सह्या घेतल्या, मनोज जरांगेंचा खळबळजनक आरोप

मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने मराठा समाज मुंबईच्या दिशेने कूच करत आहे. एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षण पदयात्रा नवी मुंबईत दाखल झाली. सध्या मनोज जरांगे पाटील हे नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीत आहेत. याठिकाणी प्रजासत्ताक दिनानिमित्त मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते ध्वजावंदन करण्यात आले. दरम्यान, मुंबई दाखल होण्यापूर्वी आझाद मैदानावरुन पोलीस प्रशासन आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात वाद पेटला आहे. 

मनोज जरांगे पाटील यांनी एक खळबळजनक आरोप केला आहे. "मी लोणावळ्यात असताना पोलिसांनी काहीतरी कागदावर सह्या घेतल्या. कोर्टाचा आदेश असल्याचे सांगितले. मी झोपेत होतो. आपण कोर्टाचा सन्मान करतो. यामुळे मी त्या इंग्रजी कागदावर लगेच सही केली. परंतु तो कागद आझाद मैदानासंदर्भात होता. आझाद मैदानाची परवानगी नाकारल्याचा तो कागद होता. माझी फसवणूक करुन ही सही घेतली आहे. परंतु जर त्याचा दुरुपयोग केला तर गाठ माझ्याशी आहे", असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.

दरम्यान, आझाद मैदानात आंदोलनाला परवानगी नाकारत खारघरच्या सेंट्रल पार्क मैदानावर आंदोलन करावे, हा मुंबई पोलिसांचा प्रस्ताव मनोज जरांगे पाटील यांनी धुडकावला आहे. आझाद मैदानावर आंदोलन करण्याच्या निर्णयावर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. यामुळे शुक्रवारी सकाळपासून मुंबईतील आझाद मैदानात आंदोलक पोहचू लागले आहेत. तर वाशी येथे थोड्याच वेळात मनोज जरांगेंची सभा होणार आहे. यानंतर ते मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे. 

मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी मंत्र्यांनी पाठ फिरवली
वाशी येथील सभेनंतर मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत. मात्र, त्याआधी राज्य सरकारचं शिष्टमंडळ आणि  मनोज जरांगे यांच्यामध्ये चर्चा होणार आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी मंत्र्यांनी पाठ फिरवली आहे. मनोज जरांगे पाटील यांना भेटीसाठी येणाऱ्या शिष्टमंडळात देखील मंत्र्यांचा सहभाग दिसत नाही. गेल्या तीन शिष्टमंडळाच्या बैठकीत छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त उपस्थित होते, आज येणाऱ्या शिष्टमंडळात देखील एकही मंत्री नाही.

नवी मुंबईतील वाहतूकीत बदल
वाशी एपीएमसी सेक्टर १९ चौकी बंद केल्यामुळे बस मार्ग क्रमांक ५०७,५१७,५३३ चे प्रवर्तन वाशी बस स्थानक येथे पहिल्या बस पासून खंडित करण्यात आले आहे.त्याचप्रमाणे वाशी बस स्थानकांकडून नेरूळकडे जाणारा आनंद ऋषी मार्ग हा शिवाजी चौकापासून बंद केल्यामुळे बस मार्ग क्रमांक ५०४,५०२,५०५ इत्यादीचे अप दिशेचे प्रवर्तन सायन पनवेल मार्ग, शिवाजी चौक येथे यु  वळसा घेऊन पुन्हा सायन पनवेल मार्गाने सकाळी ६.०० वाजल्यापासून परावर्तित करण्यात आले आहे.  

Web Title: Police took signatures while sleeping, Manoj Jarang's sensational allegation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.