Police, RTO's strict watch on private travels in the diwali period | दिवाळी दरम्यान खासगी ट्रॅव्हल्सवर पोलीस, आरटीओची करडी नजर
दिवाळी दरम्यान खासगी ट्रॅव्हल्सवर पोलीस, आरटीओची करडी नजर

ठळक मुद्देसण-उत्सवाच्या काळात खासगी ट्रॅव्हल्सच्या प्रवाशांकडून आकारले जातात दामदुप्पट पैसे

पुणे : दिवाळीनिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची खासगी ट्रॅव्हल्सकडून आर्थिक लूट होऊ नये, यासाठी वाहतूक पोलीस व प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून त्यांच्यावर करडी नजर ठेवली जाणार आहे. एसटी महामंडळाच्या तिकीटदराच्या दीडपटीहून अधिक तिकीट दर आकारल्यास संबंधित वाहतूकदारांवर कारवाई केली जाणार आहे. 
सण-उत्सवाच्या काळात खासगी ट्रॅव्हल्समधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दामदुप्पट पैसे आकारले जात होते. प्रवाशांची ही लूट थांबविण्यासाठी राज्य शासनाने एप्रिल २०१८ मध्ये निर्णय घेत त्यावर बंधने आणली. या निर्णयानुसार, एसटी महामंडळाच्या बस तिकीट दराच्या तुलनेत खासगी ट्रॅव्हल्सला केवळ दीड पट तिकीट दर आकारण्याचे बंधन घातले आहे. त्यापेक्षा अधिक पैसे घेतल्यास संबंधित वाहतूकदारांवर कारवाई केली जाते. सध्या दिवाळी सणामुळे बाहेरगावी जाणाºया प्रवाशांची संख्या वाढू लागली आहे. यापार्श्वभूमीवर वाहतूक पोलीस व आरटीओकडून नुकतीच खासगी ट्रॅव्हल वाहतुकदारांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांच्यासह आरटीओ व वरिष्ठ अधिकारी, वाहतूकदार, चालक, व्यवस्थापक, बुकिंग एंजट आदी उपस्थित होते.  
निश्चित दरापेक्षा अधिक भाडे आकारल्याची तक्रार आल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे. वाहतूक पोलिसांकडूनही साध्या गणवेशात पोलीस कर्मचाऱ्यांना प्रवासी पाठवून जास्त भाडे आकारणाऱ्यांवर कारवाई करणार आहे. ट्रॅव्हल बसेस पार्किंग होतात त्याठिकाणी प्रवाशांना पार्किंगची व्यवस्था असावी, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृह, सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षारक्षक, वाहतुकीसाठी वॉर्डन असावेत, अशा सूचना दिल्यात. बसथांबल्यावर बसजवळ रिक्षाचे चालक किंवा त्यांचे एजंट प्रवाशांच्या इच्छेविरुद्ध रिक्षाने प्रवासाची सक्ती करणार नाही, याकडे लक्ष देण्याची सूचनाही वाहतूकदारांना दिली आहे, अशी माहिती देशमुख यांनी दिली. 
.....

वाहतूक पोलिसांकडून हेल्पलाइन
खासगी ट्रॅव्हल बसमध्ये जादा भाडे आकारले जात असल्यास थेट वाहतूक पोलिसांकडे तक्रार करता येणार आहे. त्यासाठी स्वतंत्र हेल्पलाइन दिली आहे. 
........
तक्रार करण्यासाठी...
व्हाट्स अ‍ॅप क्रमांक - ८४११८००१००
वाहतूक शाखा नियंत्रण कक्ष - 
०२०-२६६८५०००
ट्विटर - @पुणे सिटी ट्रॅफिक 


Web Title: Police, RTO's strict watch on private travels in the diwali period
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.