पोलीस प्रशासनाची धुरा महिला अधिकाऱ्याकडे
By Admin | Updated: April 29, 2017 02:08 IST2017-04-29T02:08:04+5:302017-04-29T02:08:04+5:30
पोलीस अधिकाऱ्यांच्या ‘मेगा’ बदल्यांमध्ये मुंबई पोलीस दलात मोठे फेरबदल झाले असून सहआयुक्त अर्चना त्यागी यांच्या रूपाने

पोलीस प्रशासनाची धुरा महिला अधिकाऱ्याकडे
मुंबई : पोलीस अधिकाऱ्यांच्या ‘मेगा’ बदल्यांमध्ये मुंबई पोलीस दलात मोठे फेरबदल झाले असून सहआयुक्त अर्चना त्यागी यांच्या रूपाने खात्याचा कणा समजल्या जाणाऱ्या प्रशासनाची धुरा प्रथमच महिला अधिकाऱ्याकडे आली आहे. सहआयुक्त, अप्पर आयुक्त व उपायुक्त दर्जाच्या एकूण आठ अधिकाऱ्यांच्या आयुक्तालयाबाहेर बदल्या झाल्या तर दहा नवे चेहरे आले असून त्यांना कोणती जबाबदारी सोपविली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखा, तिघा सहआयुक्तांची अन्यत्र बदली झाली असून चौघांना अधिकाऱ्यांची अप्पर आयुक्त म्हणून बढती देण्यात आली आहे. त्यापैकी तिघांना मुंबईत पोस्टिंग मिळाले आहे.
मुंबई पोलीस दलात प्रशासन विभागाच्या प्रमुख पदाची जबाबदारी आतापर्यंत महिलेला मिळालेली नव्हती. अर्चना त्यागी आता ती कशी सांभाळतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहील. आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेचे सहआयुक्त प्रवीण साळुंके यांची मुंबई कारागृह विभागात बदली झाली. त्यांच्या जागी ठाण्याचे सहआयुक्त आशुतोष डुंबरे काम पाहतील. तर प्रशासन विभागाचे सहआयुक्त अनुपकुमार सिंह यांची त्यागी यांच्या ठिकाणी बदली झाली आहे. वाहतूक विभागाचे प्रमुख मिलिंद भारंबे यांची औरंगाबाद परिक्षेत्राच्या विशेष महानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याची धुरा अमितेशकुमार सांभाळणार आहेत.
मुंबईतील अप्पर आयुक्त प्रताप दिघावकर, आर.डी. शिंदे, मनोज लोहिया यांची बदली झाली आहे. दिघावकर हे ठाणे आयुक्तालयात तर लोहिया यांची राज्य परिवहन महामंडळाच्या मुख्य दक्षता अधिकारी पदावर बदली झाली आहे. शिंदे यांची गडचिरोली परिक्षेत्राच्या अप्पर आयुक्तपदावर नियुक्ती झाली आहे.
मुंबई पोलीस दलातील परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त डॉ. प्रवीण पडवळ यांना अप्पर पोलीस आयुक्तपदी बढती देत दक्षिण प्रादेशिक विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मुंबईचे पोलीस उपायुक्त एस. जयकुमार यांना बढती देत अप्पर पोलीस आयुक्त मध्य प्रादेशिक विभाग, अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांची बढतीवर पूर्व प्रादेशिक विभागाच्या अप्पर आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. पोलीस उपायुक्त डॉ. जय जाधव यांची पुण्याला गुन्हे अन्वेषण विभागात, तर परिमंडळ-९चे उपायुक्त सत्यनारायण चौधरी यांची पदोन्नतीवर ठाणे शहरच्या पश्चिम प्रादेशिक विभागात बदली झाली आहे. राज्य गुप्तवार्ता विभागाचे उपायुक्त संदीप कर्णिक यांची पदोन्नतीवर राज्य राखीव पोलीस बलाचे पोलीस उपमहानिरीक्षकपदी बदली करण्यात आली. मुंबई पोलीस दलातील गुन्हे शाखेचे उपायुक्त शशिकांत सातव यांची पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली आहे. तर मुंबईत कार्यरत असलेल्या पोलीस उपायुक्त पदावरील अधिकाऱ्यांना बढती देण्यात आली आहे. वाहतूक शाखेतील उपायुक्त संजय मोहिते आता कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक बनले आहेत. परिमंडळ १२चे उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांची नांदेडला नागरी हक्क संरक्षण विभागात तर पोलीस मुख्यालयातील उपायुक्त पी. बी. सावंत यांची राज्य राखीव पोलीस बल गट नवी मुंबईचे समादेशक म्हणून तर समाजसेवा शाखेचे पोलीस उपायुक्त प्रवीण पाटील यांच्यावर महाराष्ट्र राज्य विधान मंडाळाचे मुख्य सुरक्षा अधिकारी म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नवी मुंबईतील उपायुक्त दिलीप सावंत यांना पुन्हा मुंबईत काम करण्याची संधी मिळाली आहे. (प्रतिनिधी)