ज्वेलर्ससह वित्तसंस्थांना पोलिसांच्या नोटिसा

By Admin | Updated: August 22, 2016 03:04 IST2016-08-22T03:04:45+5:302016-08-22T03:04:45+5:30

सुरक्षेत हलगर्जीपणा करणाऱ्या ज्वेलर्ससह शहरातील वित्तसंस्थांना पोलिसांनी नोटिसा बजावायला सुरुवात केली आहे.

Police Notices to the Financial Institutions including Jewelers | ज्वेलर्ससह वित्तसंस्थांना पोलिसांच्या नोटिसा

ज्वेलर्ससह वित्तसंस्थांना पोलिसांच्या नोटिसा


नवी मुंबई : सुरक्षेत हलगर्जीपणा करणाऱ्या ज्वेलर्ससह शहरातील वित्तसंस्थांना पोलिसांनी नोटिसा बजावायला सुरुवात केली आहे. सीवूडमधील पॉप्युलर फायनान्स कंपनीवर पडलेल्या दरोड्यानंतर त्याठिकाणचा सुरक्षेतला हलगर्जीपणा समोर आला आहे. यापूर्वी देखील ज्वेलर्सवर अशाप्रकारे दरोड्याच्या घटना घडलेल्या असल्यामुळे पोलिसांनी सुरक्षेत हलगर्जी करणाऱ्या ज्वेलर्ससह वित्तसंस्थांची झाडाझडती घेण्याला सुरवात केली आहे.
सीवूड येथील पॉप्युलर फायनान्स कंपनीवर भरदिवसा दरोडा पडल्याची घटना ६ आॅगस्टला घडली आहे. अज्ञात पाच ते सहा जणांच्या टोळीने त्याठिकाणच्या सुरक्षेतल्या हलगर्जीपणाचा फायदा घेत हा दरोडा टाकला. यामध्ये पॉप्युलर फायनान्समध्ये जमा असलेले सुमारे २३ किलो सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे ७ कोटींचा ऐवज दरोडेखोरांनी लुटून नेला आहे. या घटनेच्या काही दिवस अगोदरच पोलिसांनी शहरातील ज्वेलर्स व वित्तसंस्थांना खबरदारीच्या सूचना दिल्या होत्या. अनेक ठिकाणी सुरक्षेची पुरेपूर खबरदारी घेतली जात नसल्याचे उघड झाले आहे. दरोडेखोरांनी लुटून नेलेल्या दागिन्यांचा विमा असल्यामुळे पॉप्युलर वित्तसंस्थेने घटनेचे फारसे गांभीर्य घेतले नसल्याचे दिसून येत आहे. मात्र या घटनेच्या माध्यमातून गुन्हेगारांनी नवी मुंबई पोलिसांना आव्हान दिलेले असल्यामुळे लवकरात लवकर त्यांच्या मुसक्या आवळण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.
>शस्त्रधारी सुरक्षारक्षक नेमण्याच्या सूचना
अशा प्रकारच्या दरोड्याच्या घटनांचे पोलिसांनी गांभीर्य घेतले आहे. यापूर्वीही खारघर, दिघा, वाशी याठिकाणी अशा प्रकारे दरोड्याच्या घटना घडल्या असून त्यापैकी काही गुन्ह्यांची अद्याप उकल देखील झालेली नाही. त्यामुळे भविष्यात पुन्हा असे दरोडे पडू नयेत याकरिता सुरक्षेत हलगर्जीपणा करणाऱ्या वित्तसंस्था व ज्वेलर्सची झाडाझडती घेण्याला पोलिसांनी सुरवात केली आहे. ज्वेलर्समध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून त्यांचा डिव्हीआर गुप्त ठिकाणी ठेवावा, दर्शनी भागात खरे दागिने ठेवू नयेत तसेच बँका, फायनान्स कंपन्या यांनी शस्त्रधारी सुरक्षारक्षक नेमावेत अशा वेळोवेळी सूचना पोलिसांकडून केल्या जातात. यानंतरही अगदी सूचनेच्या विरुध्द चित्र शहरात अनेक ज्वेलर्स व वित्तसंस्थांमध्ये पहायला मिळत आहे. याचाच पुरेपूर फायदा गुन्हेगारांकडून घेतला जात आहे. त्याकरिता गुन्हेगारांच्या टोळ्या अशा वित्तसंस्थांवर नजर ठेवून असल्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.

Web Title: Police Notices to the Financial Institutions including Jewelers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.