पुणे बाँबस्फोट केल्याचे सांगून केली पोलीसांची दिशाभूल
By Admin | Updated: July 19, 2014 11:12 IST2014-07-19T10:47:10+5:302014-07-19T11:12:17+5:30
मित्रांची देणी चुकवायची असलेल्या एका काश्मिरी तरुणानं आम्ही पुणे बाँबस्फोट घडवल्याचे सांगत पोलीसांची दिशाभूल केली आहे.

पुणे बाँबस्फोट केल्याचे सांगून केली पोलीसांची दिशाभूल
>ऑनलाइन टीम
पुणे, दि. १९ - मित्रांची देणी चुकवायची असलेल्या एका काश्मिरी तरुणानं आम्ही पुणे बाँबस्फोट घडवल्याचे सांगत पोलीसांची दिशाभूल केली आहे. बशीर अहमग गोगलू असे या काश्मिरी तरुणाचे नाव असून काही मित्रांची देणी त्याने थकवली आहेत. त्यांना अडकवण्यासाठी गोगलू पोलीसांकडे स्वत:हून गेला आणि आपणच पुण्याचे बाँबस्फोट घडवल्याचे सांगून आणखी सहकारी म्हणून त्या मित्रांची नावे त्याने पोलीसांना सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले.
गोगलूने आपले मित्र नाजिद शाह, मुदस्सर नझर आणि साजिद फय्याज मलिक अशी अन्य तिघांची नावे पोलीसांना सांगितली व त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केल्याचे समजते. हे सगळे मूळचे काश्मिरी आहेत. पोलीसांनी खोडसाळपणाचा व पोलीसांची दिशाभूल केल्याचा आरोप ठेवत गोगलूवर गुन्हा दाखल केला आहे.
जुलैच्या १० तारखेला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरालगत पोलिस ठाण्याच्या आवारात झालेल्या बॉंबस्फोटात सहा जण जखमी झाले होते. या स्फोटाचा तपास एटीएस करीत असून या आरोपींची चौकशी एटीएस करत आहे.
शहरातील विविध महत्त्वपूर्ण ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांतील चित्रीकरण तपासण्याचे काम सुरू आहे. न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवालही एटीएसला प्राप्त झाला असून त्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपासाला गती मिळाल्याचे समजते. एटीएसच्या अधिका-यांकडून सर्व शक्यता गृहीत धरून तपास करण्यात येत आहे. एटीएससोबतच पुणे पोलिस, राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि नॅशनल सिक्युरिटी गार्ड (एनएसजी) या तपास यंत्रणांकडून युद्धपातळीवर तपास सुरू आहे.