कॅन्सरग्रस्त मुलगा बनला पोलीस निरीक्षक

By Admin | Updated: August 11, 2015 01:49 IST2015-08-11T01:49:37+5:302015-08-11T01:49:37+5:30

पोलीस निरीक्षक बनण्याची एका चिमुरड्याची इच्छा होती. मात्र हे स्वप्न पूर्ण होण्यापूर्वीच त्याला कॅन्सरने ग्रासले. त्याची ही इच्छा अपुरीच राहणार अशी भीती त्याला वाटत होती, मात्र भोईवाडा

Police inspector became a cancerous boy | कॅन्सरग्रस्त मुलगा बनला पोलीस निरीक्षक

कॅन्सरग्रस्त मुलगा बनला पोलीस निरीक्षक

मुंबई : पोलीस निरीक्षक बनण्याची एका चिमुरड्याची इच्छा होती. मात्र हे स्वप्न पूर्ण होण्यापूर्वीच त्याला कॅन्सरने ग्रासले. त्याची ही इच्छा अपुरीच राहणार अशी भीती त्याला वाटत होती, मात्र भोईवाडा पोलिसांनी या चिमुरड्याची इच्छा सोमवारी पूर्ण केली.
कुवरसिंह पाटील (५) असे या चिमुरड्याचे नाव आहे. तो जळगाव जिल्ह्यात राहतो. हुशार आणि सर्वांचा लाडका असलेल्या या चिमुरड्याला डिसेंबर महिन्यात रक्ताचा कर्करोग असल्याचे निदान झाले. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी त्याला उपचारासाठी मुंबईला आणले. सध्या त्याच्यावर टाटा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यादरम्यान ‘मेक अ विश’ या संस्थेच्या एका कार्यकर्त्याला त्याने आपली पोलीस बनण्याची इच्छा असल्याचे सांगितले. संस्थेने भोईवाडा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिरीष सावंत यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनीदेखील या चिमुरड्याची इच्छा पूर्ण करण्याची तयारी दर्शवली. सोमवारी सकाळी पोलिसांच्या गणवेशात त्याला पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यानंतर त्याला वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या खुर्चीवर बसवण्यात आले. काही वेळ त्याच्याच आदेशाने पोलिसांचे कामकाज सुरू होते. या चिमुरड्याला पोलिसांबद्दल असलेले कुतूहल पाहून पोलिसांनीदेखील त्याच्या आदेशाचे पालन केले. त्यानंतर त्याला पोलिसांच्या गाडीतूून संपूर्ण परिसरात फिरवण्यात आले. आपल्या चिमुकल्याचा हा थाट पाहून त्याच्या आई-वडिलांच्या डोळ्यांत पाणी तरळले. तीन तास त्याचा हा थाट होता. त्यानंतर तो पुन्हा रुग्णालयात जाण्यासाठी निघाला, तेव्हा सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तो लवकर बरा व्हावा, यासाठी प्रार्थना करत होते. या वेळी अनेकांच्या डोळ्यांत पाणी आले. (प्रतिनिधी)

Web Title: Police inspector became a cancerous boy