अमेरिकन युवतीला पोलिसांची मदत

By Admin | Updated: August 1, 2016 07:02 IST2016-08-01T07:02:29+5:302016-08-01T07:02:29+5:30

रस्ता चुकल्याने गोंधळलेल्या अमेरिकन युवतीला वेळीच ताब्यात घेऊन तिला सुखरूप तिच्या आईच्या हवाली केलं

Police help American youth | अमेरिकन युवतीला पोलिसांची मदत

अमेरिकन युवतीला पोलिसांची मदत


नागपूर : रस्ता चुकल्याने गोंधळलेल्या अमेरिकन युवतीला वेळीच ताब्यात घेऊन तिला सुखरूप तिच्या आईच्या हवाली करण्याची प्रशंसनीय कामगिरी केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कळमन्यातील सहायक निरीक्षक धर्मेंद्र आवारी आणि शिपाई रुपम यांचा सत्कार केला.
दीड महिन्यांपूर्वी लॉस एंजेलिस येथून भारतात पर्यटनाला आलेल्या लुसी चेन या युवतीने बेंगळुरू येथून रायपूर गाठले. तेथे महत्वाची कागदपत्रे हरविल्याचे लक्षात आल्याने ती पुन्हा नागपूर मार्गे बेंगरुळूकडे निघाली. मात्र. खासगी प्रवासी बसच्या वाहकाने तिला पारडी (कळमन्यात) उतरवून दिले. ती रस्ता विसरल्याने ईकडे तिकडे फिरू लागली. ते पाहून सडजछाप मजनू तिच्या अवतीभवती घुटमळू लागले. भाषेची मुख्य अडचण असल्याने लुसी चांगलीच गोंधळली. तिची ही अवस्था पाहून एका सद्गृहस्थाने कळमना पोलिसांना फोन केला. सहायक निरीक्षक धर्मेंद्र आवारी, रुपम आणि त्यांच्या सहका-यांनी तिला ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले. नंतर अमेरिकन दुतावासा मार्फत तिच्या आईला फोन केला. आई नागपुरात पोहचण्यासाठी तीन दिवस लागले. तोपर्यंत लुसीचा मुक्काम कळमना मार्केटजवळच्या एका हॉटेलात होता. लुसीने आईला आपली प्रवासयात्रा आणि कळमना पोलिसांचा सौजन्यपूर्ण व्यवहार सांगितला. कळमना पोलिसांनी नंतर या दोन मायलेकींना बेंगळुरू येथे हरविलेले लुसीचे कागदपत्र मिळवून देण्यासही मदत केली. पोलिसांचे आभार व्यक्त करीत अमेरिकन मायलेकी १८ जूनला आपल्या देशात परतल्या. दरम्यान, हा प्रकार अमेरिकन दूतावासाला कळला. त्याची दखल घेत कौन्सिलेट जनरल आॅफ द युनायटेड स्टेटस् आॅफ अमेरिकाचे कौन्सिल जनरल थॉमस वाज्डा यांनी २० जून रोजी कळमना पोलीस ठाण्याला एक पत्र पाठविले. त्यात अमेरिकन कौन्सिलने पोलिसांच्या कार्यशैलीची प्रशंसा करून त्यांचे आभारही मानले आहे. ही गौरवास्पद बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळाली. त्यामुळे त्यांनी रविवारी एका कार्यक्रमात एपीआय आवारे आणि शिपाई रुपमचे कौतूक केले. त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव आणि सहआयुक्त संतोष रस्तोगी प्रामुख्याने उपस्थित होते.

Web Title: Police help American youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.