पोलिसांसमक्ष पीडितेच्या घरावर दगडफेक
By Admin | Updated: August 1, 2016 04:58 IST2016-08-01T04:58:14+5:302016-08-01T04:58:14+5:30
भांबोरा (ता़ कर्जत) येथील पीडित मुलीच्या घरावर रविवारी दुपारी आरोपींच्या नातेवाइकांनी दगडफेक केली़

पोलिसांसमक्ष पीडितेच्या घरावर दगडफेक
कर्जत(अहमदनगर) : भांबोरा (ता़ कर्जत) येथील पीडित मुलीच्या घरावर रविवारी दुपारी आरोपींच्या नातेवाइकांनी दगडफेक केली़ विशेष म्हणजे भांबोरा येथे पोलिसांचा ताफा असतानाही पीडितेच्या घरावर दगडफेक झाली़ घटनेची माहिती मिळताच पोलीस पीडितेच्या घराकडे धावले़ दगडफेक करणाऱ्यांनी पोलिसांसमोरूनच धूम ठोकली़ तरीही पोलीस त्यांना पकडू शकले नाहीत़ या दगडफेकीत पीडित मुलगी जखमी झाली.
शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे या रविवारी दुपारी घटनेची माहिती घेण्यासाठी पीडितेच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यास भांबोरा येथे आल्या़ गोऱ्हे गावकऱ्यांशी संवाद साधत असतानाच पीडितेच्या घरावर आरोपींच्या नातेवाइकांनी दगडफेक केली़ त्यामुळे गोऱ्हे यांच्यासह सर्व गावकरी पीडितेच्या घराकडे धावले़ हे पाहून दगडफेक करणाऱ्यांनी तेथून धूम ठोकली़ विशेष म्हणजे त्या वेळी पोलीसही तेथेच होते़ मात्र, पोलिसांनी या दगडफेक करणाऱ्यांना पकडण्यासाठी कोणतीही हालचाल केली नाही़ या दगडफेकीत पीडित मुलीच्या हाताला जखम झाली. गोऱ्हे यांनी पीडितेच्या हातावर प्रथमोपचार केले़ यानंतर पीडितेच्या घराला संरक्षण देण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)
>आणखी एक घटना
कोपर्डीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची झालेली हत्या व भांबोऱ्यातील छेडछाडीची घटना ताजी असतानाच नगर तालुक्यातील नांदगाव शिंगवे येथे शनिवारी अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली. लागोपाठच्या घटनांमुळे नगर जिल्हा सुन्न झाला आहे़
>आरोपी वाळूतस्कर
अत्याचाराच्या घटनेत सहभागी असलेला वसंत वाघमारे हा पीडित अल्पवयीन मुलीचा नातेवाईक आहे़ मल्हारी उमप हा वाळूतस्कर असून, त्याने याआधीही गावात मुलींची छेड काढलेली आहे़ त्याच्या विरोधात तक्रारी आहेत.