पंतप्रधानांचा दौरा पाच तासांचा?
By Admin | Updated: August 15, 2014 00:39 IST2014-08-15T00:39:17+5:302014-08-15T00:39:17+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २१ तारखेच्या नागपूर जिल्हा दौऱ्याचा अधिकृत कार्यक्रम प्रशासनाकडे आला नसला तरी, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोदी यांचा नागपूर जिल्हा दौरा पाच तासांचा

पंतप्रधानांचा दौरा पाच तासांचा?
राज्यपाल, मुख्यमंत्री येणार
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २१ तारखेच्या नागपूर जिल्हा दौऱ्याचा अधिकृत कार्यक्रम प्रशासनाकडे आला नसला तरी, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोदी यांचा नागपूर जिल्हा दौरा पाच तासांचा राहण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोदी यांचे दुपारी २ वाजता नागपूर विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर ते राजभवनावर जातील. तेथून ते हेलिकॉप्टरने मौदा येथे नॅशनल थर्मल पॉवर स्टेशनतर्फे (एनटीपीसी) आयोजित कार्यक्रमासाठी जातील. तेथे ३ वाजता कार्यक्रम आहे. तेथून ते नागपूरला येतील. सायं. ५ वाजता कस्तूरचंद पार्कवर आयोजित मेट्रो रेल्वेसह विविध विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमास ते उपस्थित राहतील. एनटीपीसी आणि नागपूरमधील कार्यक्रमास राज्यपाल के. शंकरनारायणन, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल, केंद्रीय शहर विकास मंत्री वेंकय्या नायडू आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अन्य मंत्री उपस्थित राहण्याची शक्यता आहे. मोदी त्यांच्या व्यस्त दौऱ्यात दीक्षाभूमी आणि स्मृतिमंदिरालाही भेट देण्याची शक्यता आहे.
या कार्यक्रमात शेवटच्या क्षणापर्यंत बदल होण्याची शक्यता असल्याने, दौऱ्याचा अधिकृत कार्यक्रम आल्यावरच त्यावर शिक्कामोर्तब होईल. दरम्यान, एनटीपीसीने मौदा येथील कार्यक्रमाची तयारी सुरू केली आहे. गुरुवारी विभागीय आयुक्त कार्यालयात एनटीपीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची विभागीय आयुक्तांसोबत बैठक झाली. येत्या दोन-तीन दिवसांत पंतप्रधानांच्या दौऱ्याचा अधिकृत कार्यक्रम प्रशासनाकडे येण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)