पीएमपीचा दैनिक पास ५० रुपयांत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2016 00:34 IST2016-08-06T00:34:37+5:302016-08-06T00:34:37+5:30
येत्या ३० आॅगस्ट रोजी एक वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने पीएमपीकडून प्रवाशांना दैनिक पास अवघ्या ५० रुपयंत देऊन अनोखी भेट देण्यात येणार

पीएमपीचा दैनिक पास ५० रुपयांत
पुणे : संगमवाडी ते विश्रांतवाडी या बीआरटी मार्गाला येत्या ३० आॅगस्ट रोजी एक वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने पीएमपीकडून प्रवाशांना दैनिक पास अवघ्या ५० रुपयंत देऊन अनोखी भेट देण्यात येणार आहे. येत्या १४ ते ३१ आॅगस्ट या कालावधीत ही सवलत मिळणार असून तिचा फायदा लाखो प्रवाशांना घेता येईल.
हा पास सध्या ७० रुपयांना दिला जातो. त्यावर शहरात संपूण दिवसभर कोठेही प्रवास करता येतो. दरम्यान, या निर्णयाचे प्रवासी संघटना तसेच प्रवाशांनी स्वागत केले असून या सवलतीला मिळणारा प्रतिसाद पाहून त्यापुढेही ती कायम ठेवावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
महापालिकेकडून शहरात १०१ किलोमीटर मार्गाची बीआरटी सुरू करण्यात येणार आहे. त्याला ‘रेनबो बीआरटी’ असे नाव देण्यात आले आहे. त्या अंतर्गत मागील वर्षी ३० आॅगस्ट २०१५मध्ये संगमवाडी ते विश्रांतवाडी या मार्गावर ही सेवा सुरू करण्यात आली. त्यानंतर औंध ते रावते, किवळे आणि नगररस्ता या मार्गांवरही ही सेवा सुरू करण्यात आली आहे. त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
(प्रतिनिधी)
>सर्व केंद्रांवर सुविधा
प्रवाशांना बीआरटीकडे आकर्षित करण्यासाठी प्रशासनाकडून ही अनोखी भेट देण्यात येणार आहे. १४ ते ३१ आॅगस्ट या कालावधीत पीएमपीची सर्व पास केंद्रे तसेच बसमधील वाहकांकडे हे सवलतीचे पास उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे पीएमपी प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
>१० किमीसाठी
१० रुपये आकारावेत
पीएमपी प्रशासनाकडून सवलतीत पास देण्याच्या निर्णयाचे स्वागत पीएमपी प्रवासी मंचाने केले आहे. मात्र, ही सवलत १४ आॅगस्टपासून सुरू न करता उद्यापासूनच सुरू करण्यात यावी, तसेच पासची ही किंमत कायम असावी, अशी मागणी मंचाचे अध्यक्ष जुगल राठी यांनी केली आहे.
याशिवाय संघटनेने यापूर्वी केलेल्या मागणीनुसार, मासिक पास २५० रुपये, १० किलोमीटर अंतरासाठी १० रुपये करावेत, अशी मागणीही संघटनेने केली.
या सवलतीच्या पासची मोठ्या प्रमाणात पीएमपी प्रशासनाने जनजागृती करावी, अशी मागणीही मंचाच्या वतीने प्रभारी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कुणाल कुमार यांच्याकडे करण्यात आली.