पीएम किसान योजनेची व्याप्ती वाढविणार; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 05:25 IST2019-02-25T05:25:18+5:302019-02-25T05:25:31+5:30
विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू होत असून त्याच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्र परिषदेत मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली.

पीएम किसान योजनेची व्याप्ती वाढविणार; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
मुंबई : ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ योजनेची (पीएम किसान) व्याप्ती राज्यात वाढविली जाईल आणि अधिक शेतकऱ्यांना तिचा लाभ दिला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी जाहीर केले. लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक एकत्रितपणे होणार असल्याची शक्यता त्यांनी स्पष्टपणे फेटाळून लावली.
विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू होत असून त्याच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्र परिषदेत मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. पीएम किसान योजनेंतर्गत दोन हेक्टरपेक्षा कमी शेतजमीन असलेल्या शेतकºयांना वार्षिक सहा हजार रुपयांची मदत दिली जाते. मात्र, विदर्भ, मराठवाड्यासह राज्याच्या अन्य भागात विशेषत: कोरडवाहू शेती यापेक्षा अधिक असलेले असंख्य शेतकरी या योजनेपासून वंचित राहत असल्याचे आणि शासकीय पातळीवर व्यापी वाढविण्याचा विचार सुरू असल्याचे वृत्त लोकमतने सर्वप्रथम दिले होते. मुख्यमंत्र्यांनी त्यावर शिक्कामोर्तब केले. अशा वंचित शेतकºयांनाही पीएस किसान योजनेचा लाभ मिळावा म्हणून रुपरेषा तयार केली जात आहे, असे मुख्यमंत्र्यांनी आज स्पष्ट केले.
राज्य सरकार दोन हेक्टरची मर्यादा शिथिल करणार असल्याने आणखी शेतकºयांना योजनेचा लाभ होईल. ही व्याप्ती वाढविल्याने येणारा सुमारे चार हजार कोटी रुपयांचा आर्थिक भार राज्य शासन उचलेल, असे सूत्रांनी सांगितले.