रेल्वे करणार चार कोटी वृक्षांची लागवड
By Admin | Updated: April 28, 2017 16:48 IST2017-04-28T16:47:24+5:302017-04-28T16:48:01+5:30
निर्णय: रेल्वे व वनविभागाच्या सयुंक्त करारावर स्वाक्षरी,1 ते 7 जुलै र्पयत उद्दिस्ट

रेल्वे करणार चार कोटी वृक्षांची लागवड
ऑनलाईन लोकमत विशेष /पंढरीनाथ गवळी
भुसावळ, दि.28- मध्य रेल्वे 1 ते 7 जुलै 2017 या कालावधीत सुमारे चार कोटी वृक्षांची लागवड रेल्वे मालकीच्या जागेवर करणार आहे. याबाबतचा निर्णय आणि करार नुकताच रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आणि महाराष्ट्राचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत पुणे येथील बैठकीत झाल्याची माहिती मध्य रेल्वेच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाने दिली आहे.
रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या पुढाकाराने रेल्वे आणि महाराष्ट्र शासनाचा वनविभाग यांच्यात गेल्या 22 एप्रिल रोजी करार होऊन त्यावर हस्ताक्षर झाले आहेत. रेल्वेचे मुख्य अभियंता (सामान्य) एस. एस.कालरा, वन विभागाचे प्रधान मुख्य संरक्षक आर.के.चड्डा यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत करारावर प्रभू व मुनगंटीवार यांनी सह्या केल्या.
दरम्यान, रेल्वे मालकीच्या जागेवर वृक्ष लागडीचा करार होताच मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक डी.के.शर्मा यांनी मध्य रेल्वेच्या मुंबई, भुसावळ, नागपूर, पुणे आणि सोलापूर येथील डीआरएम यांना वृक्ष लागवडीबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.
या प्रकल्पासाठी सुरेश प्रभू यांनी पुढाकार घेतला आहे. हरीत महाराष्ट्राच्या त्यांच्या संकल्पनेचा वनमंत्रालयाने गौरव केला आहे. त्यांनी मध्य रेल्वेतील अधिका:यांना वृक्ष लागवड व त्यासाठी जागा उपलब्ध करुन देण्यास सांगितले आहे.
यावर्षीच्या पावसाळ्यात 1 ते 7 जुलै या दरम्यान,मध्य रेल्वेतील भुसावळ, मुंबई, पुणे, नागपूर आणि सोलापूर या पाच विभागात रेल्वेच्या जमिनीवर वृक्ष लागवड केली जाईल. वृक्ष लागवड व तिचे संवर्धन यासाठी लागणारा खर्च व निधीची सोय रेल्वे, महाराष्ट्र राज्याचा वन विभाग, सीएसआर (सामाजिक दायित्व), एम-एनआरईजीए, एफडीसीएम लि व पाचही रेल्वे विभागाकडून करण्यात येणार आहे.जमिनीचे पट्टे, त्यांचे मोजमाप व जमिनीच्या स्थितीबाबतची माहिती रेल्वे विभाग वनविभागाला पावसाळ्यापूर्वी सादर करणार आहे.