मुंबई : पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन करण्याचा संस्कार आपल्या भारतीय संस्कृतीने दिला असून, विकासकामांचे नियोजन करताना ते निसर्गाचे नियम समजून घेऊन करणे आवश्यक आहे, अन्यथा निसर्ग आपल्या पद्धतीने न्याय देतो, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. त्यांच्या अध्यक्षतेखालील जागतिक पर्यावरण दिन कार्यक्रमात २०२०-२१ या वर्षात ‘माझी वसुंधरा’ अभियानात सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायती, नगरपंचायती, नगरपरिषदा, अमृत शहरांचा तसेच अभियानात सर्वोत्कृष्ट काम करणारे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा शनिवारी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री संजय बनसोडे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सुधीरकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, वनविभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱ्हाड, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अशोक शिनगारे, माझी वसुंधरा अभियान संचालक सुधाकर बोबडे यांच्यासह अभियानात सहभागी स्थानिक स्वराज्य संस्था पदाधिकारी, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, गाव, शहर पातळीवरील कार्यकर्ते सहभागी झाले होते.
यावेळी आगामी वर्षाच्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. वनविभाग कांदळवन कक्षाच्या ‘बायोसेंटिनल्स ऑफ कोस्टल महाराष्ट्र’ या कॉफीटेबल बुकचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. मुख्यमंत्री म्हणाले, आपण पृथ्वीला वसुंधरा म्हणतो आणि तिची गणना स्क्वेअर फुटात करतो. विकासाचा हा असा हव्यास जीवनाला घातक ठरत आहे. कोरोनामुळे ऑक्सिजनचे महत्त्व आपल्याला पटले. आपण त्याची निर्मिती करत आहोत; पण झाडांच्या रूपातील नैसर्गिक ऑक्सिजन प्लांट उद्ध्वस्त करत आहोत. वन, वन्यजीव, पर्यावरणातील सूक्ष्म घटकांचे महत्त्व, त्याचे रूप समजून घेऊन त्याच्या संवर्धनाची गरज आहे, तिथे कुणीही कमी पडता कामा नये, असे आवाहनही त्यांनी केले.
तर, पुरस्कारप्राप्त व अभियानात सहभागी सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांनी या कामात सातत्य ठेवावे, इतरांना प्रेरणा देऊन माणसाला जगवणाऱ्या या कामात त्यांनाही सहभागी होण्यास प्रोत्साहित करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचीही यावेळी भाषणे झाली.
माझी वसुंधरा अभियान-२’ प्रभावीपणे राबविणार-मनीषा म्हैसकरकार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी अभियानाची रूपरेषा सांगितली. कोरोनाचे संकट असतानाही अभियानात सहभागी झालेल्या राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी उत्तम कामगिरी केली आहे. पर्यावरण संवर्धनाचे फायदे या ठिकाणी आता दिसून येत आहेत. आता ‘माझी वसुंधरा अभियान-२’ राज्यात प्रभावीपणे राबविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था, अधिकाऱ्यांचा पुरस्काराने सन्मान- ठाणे मनपा, हिंगोली नगरपरिषद, शिर्डी नगरपंचायत, पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीला प्रथम पुरस्कार मिळाला. ऑनलाइन पद्धतीने पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.- अमृत शहरे गटामध्ये ठाणे, नवी मुंबई आणि बृहन्मुंबई महापालिका यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. उत्तेजनार्थ पुरस्कार क्रमांक-१ हा पुणे महापालिकेने, तर उत्तेजनार्थ पुरस्कार क्रमांक-२ हा नाशिक महापालिका आणि बार्शी नगरपरिषद (जि. सोलापूर) यांना विभागून देण्यात आला.- नगरपरिषद गटामध्ये हिंगोली (जि. हिंगोली), कराड (जि. सातारा) आणि जामनेर (जि. जळगाव) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. परळी (जि. बीड) नगरपरिषदेला उत्तेजनार्थ पुरस्कार क्रमांक-१ आणि वैजापूर (जि. औरंगाबाद) आणि संगमनेर (जि. अहमदनगर) यांना विभागून उत्तेजनार्थ पुरस्कार क्रमांक-२ प्रदान करण्यात आला.- नगरपंचायत गटामध्ये शिर्डी (जि. अहमदनगर), कर्जत (जि. अहमदनगर) आणि मलकापूर (जि. सातारा) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला, तर निफाड (जि. नाशिक) आणि मुक्ताईनगर (जि. जळगाव) यांनी अनुक्रमे उत्तेजनार्थ क्रमांक १ आणि २चा पुरस्कार पटकावला.- पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक), मिरजगाव (जि. अहमदनगर) आणि चिनावल (जि. जळगाव) या ग्रामपंचायतींनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. पहूर, पेठ (जि. जळगाव), लोणी बुद्रुक (जि. अहमदनगर) यांना अनुक्रमे उत्तेजनार्थ क्रमांक १ व २ चा पुरस्कार देण्यात आला.- उत्कृष्ट कामगिरीसाठी नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.- उत्कृष्ट कामगिरीसाठी जिल्हाधिकारी यांनाही पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये प्रथम पुरस्कार जळगाव जिल्हाधिकारी अभिजित राऊत आणि अहमदनगर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना विभागून प्रदान करण्यात आला. पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आणि सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंग यांना द्वितीय पुरस्कार विभागून देण्यात आला. नाशिक जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना तृतीय क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला.- जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पुरस्कार देण्यात आले. यामध्ये जळगाव जि.प.चे डॉ. बी.एन. पाटील, अहमदनगर जि.प.चे राजेंद्र क्षीरसागर आणि नाशिक जि.प.च्या लीना बनसोड यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.