झिंगाट पावसात कणसाची गोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2016 00:32 IST2016-08-06T00:32:54+5:302016-08-06T00:32:54+5:30
दोन्ही काठ गच्च भरून वाहणारी मुठा नदी... पाऊसधारांची सतत बरसात यांचा मनमुराद आनंद पुणेकरांनी शुक्रवारी दिवसभर लुटला

झिंगाट पावसात कणसाची गोडी
पुणे : दोन्ही काठ गच्च भरून वाहणारी मुठा नदी... पाऊसधारांची सतत बरसात यांचा मनमुराद आनंद पुणेकरांनी शुक्रवारी दिवसभर लुटला. पुण्यातील एकजात सगळ्या पुलांवर नदीचे वाहते पाणी पाहण्यासाठी सकाळपासूनच गर्दी झाली. धरणातून पाणी सोडण्याचे प्रमाण वाढले तसे मुठेचे पाणीही वाढले. त्यामुळे दुपारनंतर गर्दीत प्रचंड वाढ झाली. भाजलेल्या कणसांनी या गर्दीच्या आनंदात आणखी भर टाकली.
गुरुवारी पावसाने विश्रांती घेतली. शुक्रवारी मात्र सकाळीच हजेरी लावली. सुरुवातीला तो हळुवार बरसत होता, नंतर मात्र त्याने जोर धरला. संततधारच सुरू झाली. धरणक्षेत्रातही असाच जोरदार पाऊस कोसळत होता. त्यामुळेच खडकवासला धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली. मुठेचे पाणी वाढू लागले. राजाराम पूलापासून मुठा नदीवरच्या प्रत्येक पुलावर व कॉजवेवर आबालवृद्धांची गर्दी होऊ लागली. झेड ब्रिज युवकांचा अत्यंत आवडता पूल, मात्र पोलिसांनी तिथे बंदोबस्त लावला होता. नदीपात्रातून जाणारा भिडे पूल तर गुरुवारीच बंद करण्यात आला होता. तरीही या दोन्ही पुलांवर पाणी पाहण्यासाठी गर्दी झाली होती. वाहन पुलाच्या कडेला ठेवून तिथे सगळे पायीच जात होते.
गरवारे महाविद्यालयामागील एस. एम. जोशी पूल, बालगंधर्वजवळचा वि. रा. शिंदे पूल, शनिवारवाड्यासमोरचा छत्रपती संभाजी पूल गर्दीने फुलून गेले. तरुणाईने जणू पाऊस अंगात भरून घेतला. वाहने पुलाच्या कडेला लावून गर्दीने सगळे जण वाहत्या पाण्याची गंमत अनुभवत होते. त्यांच्या जोडीने काही वयोवृद्ध पुणेकरही गर्दी करीत होते. त्यांच्यातील काहींनी पानशेतच्या पुराच्या आठवणी जागवल्या. त्या वेळी पाणी कुठपर्यंत होते, कधी आले, किती दिवस होते असे अनेक प्रश्न त्यांना तरुणांनी विचारले. काही मुलींनी दप्तरातील वह्यांचे कागद फाडून त्याच्या नावा तयार केल्या व पुलावरून नदीत सोडल्या. पाण्याच्या लोटात त्यांना शोधण्याचा खेळच मग जल्लोष करीत सुरू झाला.(प्रतिनिधी)
>कचऱ्याबाबत जागृती
काही अस्सल पुणेकरांनी नदीच्या पाण्यात वाहून येत असलेल्या कचऱ्याकडे लक्ष वेधले. प्लॅस्टिकच्या पिशव्यांची संख्या त्यात जास्त होती. नदीपात्राच्या कडेला या पिशव्या अडकून राहत होत्या. बंद करा या पिशव्या वापरणे, असे आवाहनही काही पुणेकरांनी जमलेल्या गर्दीला करण्यास सुरुवात केली.
गर्दीही वाढली
चहा, गरम भजी, कोळशाच्या भट्टीत भाजलेली मक्याची गरमागरम कणसे यांच्या विक्रेत्यांनी या गर्दीच्या आनंदात भर टाकली. कणीस कुठे मिळते, अशी विचारणा करीत पुलाच्या कडेला थांबलेल्या विक्रेत्यांच्या गाड्यांवर झुंबड उडत होती. अनेक पालक बरोबरच्या मुलांना खांद्यावर घेऊन पाणी दाखवत होते. दुपारी ४ नंतर नदीचे पाणी वाढले व मग तर या गर्दीला बहरच आला. जत्रा असावी तसे नागरिक पुलावर येत होते व पावसाचा, वाहत्या पाण्याचा आनंद अनुभवत होते.