महिलांना रोजगार देण्यासाठी 'पिंक रिक्षा'अंतर्गत ५ हजार रिक्षांचे लवकरच वाटप - आदिती तटकरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 19:14 IST2025-01-29T19:13:47+5:302025-01-29T19:14:17+5:30
महिलांचे आर्थिक-सामाजिक पुनर्वसन व्हावे आणि महिला वर्गाचा प्रवास सुरक्षित व्हावा, या हेतुने निर्णय

महिलांना रोजगार देण्यासाठी 'पिंक रिक्षा'अंतर्गत ५ हजार रिक्षांचे लवकरच वाटप - आदिती तटकरे
Pink Rikshaw Yojana Aditi Tatkare : लाडकी बहिण योजनेला भरघोस यश मिळाल्यानंतर आता महिला व मुलींना रोजगार मिळावा, त्यांचे आर्थिक-सामाजिक पुनर्वसन व्हावे आणि महिला वर्गाचा प्रवास सुरक्षित व्हावा, यासाठी राबविण्यात येणाऱ्या 'पिंक ई-रिक्षा'च्या योजनेसंदर्भात मोठी घोषणा करण्यात आली आहे. या योजनेबाबत संबंधितांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केल्या. प्राप्त अर्जापैकी पाच हजार पात्र महिलांना लवकरच या योजनेअंतर्गत रिक्षाचे वितरण करण्यात येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पुढे त्या म्हणाल्या की, रस्त्यावर राहणार्या मुलांना शिक्षणाच्या व समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी फिरते पथक कार्यरत असून, आजतागायत तीन हजार पेक्षा जास्त मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम विभागाने या पथकाच्या माध्यमातून केले आहे. प्रायोगिक तत्वावर सुरू असलेल्या हा उपक्रम व्यापक स्वरूपात सुरू करण्यासाठीची कार्यवाही करण्यासंदर्भातही यावेळी अदिती तटकरे यांनी सूचना दिल्या.
नोकरी करणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी पाळणाघर आवश्यक असल्याने गरजू महिलांच्या मुलांसाठी अंगणवाडी केंद्रासोबत पाळणाघर सुरू करण्यात येणार आहे. पाळणा सेविका व मदतनीस यांचे मानधन तसेच निर्भया समुपदेशन केंद्रावरील समन्वयकाचे मानधन वाढविण्यासंदर्भातही सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचेही अदिती तटकरे यांनी यावेळी उपस्थित समन्वयक महिलांना आश्वासित केले. तसेच, माध्यमिक शिक्षणाकडे वळणाऱ्या मुलींचे प्रमाण वाढविण्यासाठी शिक्षण विभागाशी समन्वय साधुन उपाययोजना आखण्यासंदर्भातही अदिती तटकरे यांनी सांगितले.
१८ जिल्ह्यात अहिल्याभवनचे कार्य सुरू असून राज्यातील उर्वरित जिल्ह्यासाठी मध्यवर्ती ठिकाणी अहिल्याभवन उभारण्यासाठीच्या प्रक्रियेस गती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महिला आणि बालकांच्या सुरक्षेसाठी, त्यांच्या सबलीकरणासाठी अहिल्या भवनाच्या माध्यमातून अतिशय महत्वाचे काम सुरू होणार आहे. महिला व बालकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी विभागामार्फत सुरू असलेल्या योजनांचा आज मंत्री अदिती तटकरे यांनी मंत्रालयात आढावा घेतला.
प्रत्येक जिल्ह्यात उभारण्यात येणारे हे अहिल्याभवन महिला, बालक व दिव्यांगांना सर्वोतोपरी सहकार्य करण्यासाठी सज्ज असून अहिल्याभवन उभारण्यासंदर्भातील पायाभूत सुविधा उभारण्याचे निर्देशही यावेळी अदिती तटकरे यांनी दिले.