मुलाचा फोटो उराशी कवटाळून...

By Admin | Updated: August 16, 2014 02:07 IST2014-08-16T02:07:36+5:302014-08-16T02:07:36+5:30

सीआरपीएफमधील बेपत्ता मुलाचा फोटो कवटाळून एक माता दरवर्षी जिल्हा परिषदेच्या शाळेत तिरंग्याला सलाम करते.

The picture of the child is filled with ... | मुलाचा फोटो उराशी कवटाळून...

मुलाचा फोटो उराशी कवटाळून...

महागाव (यवतमाळ) : सीआरपीएफमधील बेपत्ता मुलाचा फोटो कवटाळून एक माता दरवर्षी जिल्हा परिषदेच्या शाळेत तिरंग्याला सलाम करते. देशभक्तीपर गीतांच्या आवाजात तिचा हुंदका मात्र कुणाच्याही कानावर पडत नाही. १६ वर्षांपासून एक माउली आपला मुलगा आज ना उद्या परत येईल या आशेवर जीवन जगत आहे.
महागाव तालुक्यातील सवना येथील पांडुरंग हुलगुंडे हा तरुण केंद्रीय राखीव दलात रुजू झाला. देशाच्या सेवेला आपला मुलगा अर्पण करताना आईचे हृदय भरून आले होते. मोठ्या अभिमानाने ती पांडुरंग देशसेवेसाठी जात असल्याचे सांगत होती. आपला मुलगा देशसेवा करतो, याचा तिलाच नव्हे, तर अख्ख्या गावाला अभिमान होता. पांडुरंग १९९८ साली सवना येथून कर्तव्यासाठी नेपाळच्या दिशेने निघाला. तो सीआरपीएफच्या ९५४ कंपनीत हवालदार म्हणून कार्यरत होता. मात्र तो कर्तव्यावर पोहोचलाच नाही. तो नेमका कुठे गेला याचा थांगपत्ता लागला नाही. आई धुरपताबाई यांनी पांडुरंगचा शोध सुरू केला. सीआरपीएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारणा केली. माझ्या मुलाचा शोध घ्या, असा टाहो फोडला. परंतु पांडुरंगचा थांगपत्ता लागला नाही.
२००९ साली पांडुरंगची पत्नी वंदना यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करून पतीच्या शोधासाठी शासन काय करतेय, अशी विचारणा केली. परंतु अद्याप उत्तर मिळालेले नाही.
गेल्या १६ वर्षांपासून १५ आॅगस्ट आणि २६ जानेवारीला धुरपताबाई पांडुरंगचे छायाचित्र घेऊन गावातील जिल्हा परिषद शाळेत पोहोचतात आणि मुलाचा फोटो हृदयाशी कवटाळत राष्ट्रध्वजाला सलामी देतात. त्या वेळी ऐकू येणाऱ्या देशभक्तीपर गीतांनी अश्रू अनावर होतात. ती माउली मुलाच्या आठवणीने रडते. (प्रतिनिधी)

Web Title: The picture of the child is filled with ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.