पीएच.डी. विद्यावेतन पूर्ववत
By Admin | Updated: April 6, 2017 01:07 IST2017-04-06T01:07:42+5:302017-04-06T01:07:42+5:30
यूजीसीकडून दिला जाणारा निधी बंद झाला असला तरी विद्यापीठ फंडातून त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.

पीएच.डी. विद्यावेतन पूर्ववत
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये पीएच.डी. व एम.फिल. करीत असलेल्या विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनासाठी (स्टायपेंड) यूजीसीकडून दिला जाणारा निधी बंद झाला असला तरी विद्यापीठ फंडातून त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यामुळे पीएच.डी व एम.फिलच्या अभ्यासक्रमासाठी नव्याने प्रवेश घेणाऱ्यांना विद्यार्थ्यांनाही यापुढे विद्यावेतन सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
यूजीसीकडून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये पीएच.डी करणाऱ्या विद्यार्थ्याला महिना ८ हजार (४ वर्षे) तर एम.फिल करणाऱ्या विद्यार्थ्याला महिना ५ हजार (१८ महिने) विद्यावेतन दिले जाते. दरम्यान यूजीसीकडून विद्यावेतनासाठी दिला जाणारा निधी बंद झाल्याने नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन मिळणार का, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र यूजीसीचा निधी बंद झाला असला तरी विद्यापीठ फंडातून यासाठी निधी उपलब्ध करून देऊन विद्यावेतन सुरूच ठेवणार असल्याचे विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांना संशोधनामध्ये मदत म्हणून त्यांना विद्यापीठाकडून विद्यावेतन दिले जाते. विद्यार्थ्यांनी पूर्णवेळ संशोधनासाठी देऊन दर्जेदार संशोधन करावे, यासाठी विद्यापीठाकडून ही मदत केली जात आहे. यूजीसीने यासाठी १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. त्यातून अनेक विद्यार्थ्यांना विद्यावेतन उपलब्ध करून देण्यात आले.
आगामी शैक्षणिक वर्षाच्या (२०१७-१८) पीएच.डी व एम.फिल अभ्यासक्रमासाठी लवकरच प्रवेश प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. विद्यापीठाकडून विद्यावेतन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. एम.फिल व पीएच.डी करू इच्छिणाऱ्या अनेक गरजू विद्यार्थ्यांना या निर्णयाने मोठी मदत होणार आहे. (प्रतिनिधी)
विद्यावेतनामुळे पुण्यात राहण्याच्या खर्चाच्या प्रश्न मिटणार असल्यामुळे बाहेरगावाहून आलेल्या विद्यार्थ्यांना एम.फिल व पीएच.डी़ प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहेत.
एम़ए़, एमएस्सी पूर्ण झाल्यानंतर एम.फिल करीत नेट/सेटची तयारी करण्यावर विद्यार्थ्यांकडून प्राधान्य दिले जाते. नेट/सेट व एम.फिलची डिग्री एकाच वेळी मिळवून प्राध्यापक होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यास त्यांना विद्यावेतनामुळे मदत होणार आहे.