मुंबई: शीना बोराची हत्या करण्यासाठी इंद्राणी, तिचा आधीचा पती संजीव खन्ना आणि ड्रायव्हर श्यामवर राय कट रचत असल्याची कोणतीही कल्पना पीटरला नव्हती. ज्याप्रमाणे इंद्राणी बाहेरच्या लोकांना मुर्ख बनवत होती, त्याचप्रमाणे ती पीटरलाही मुर्ख बनवत होती. पीटरचा राहुल आणि शीनाच्या प्रेमसंबंधाला विरोध नव्हता, अशी माहिती पीटर मुखर्जीतर्फे अॅड. आबाद पौडा यांनी उच्च न्यायालयाला दिली.शीना आणि राहुलच्या प्रेमसंबंधाला केवळ इंद्राणी मुखर्जीचा विरोध होता. पीटर त्यांच्या संबंधांच्या आड नव्हता. मात्र हे दोघे विवाह न करताच एकत्र राहात होते आणि यावरच पीटरने आक्षेप घेतला होता. त्यामुळे त्याने २००७ मध्ये दोघांना वेगळे राहण्यास सांगितले, असा युक्तिवाद अॅड पौडा यांनी न्या. एन. डब्ल्यु. सांबरे यांच्यापुढे केला. सत्र न्यायालयाने जामिनावर सुटका करण्यास नकार दिल्याने पीटर मुखर्जीने उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. या अर्जावर मंगळवारी सुनावणी होती.शीना बोरा हत्येप्रकरणी सीबीआयने इंद्राणी मुखर्जी, संजीव खन्ना, श्यामवर राय आणि पीटर मुखर्जीला आरोपी केले आहे. शीनाच्या हत्येचा कट रचल्याचा व हत्या केल्याचा आरोप या सर्वांवर ठेवण्यात आला आहे. दरम्यान, बुधवारीही अॅड. पौडा युक्तिवाद करणार आहेत. (प्रतिनिधी)
शीना-राहुलच्या प्रेमाला पीटरचा विरोध नव्हता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2016 05:04 IST