आरोपींच्या डीएनए चाचणीस परवानगी
By Admin | Updated: January 14, 2015 03:57 IST2015-01-14T03:57:34+5:302015-01-14T03:57:34+5:30
जवखेडे खालसा हत्याकांडातील आरोपी प्रशांत, अशोक आणि दिलीप जाधव यांची डीएनए चाचणी करण्यास पाथर्डीच्या न्यायालयाने संमती दिली आहे.

आरोपींच्या डीएनए चाचणीस परवानगी
पाथर्डी (जि. अहमदनगर): जवखेडे खालसा हत्याकांडातील आरोपी प्रशांत, अशोक आणि दिलीप जाधव यांची डीएनए चाचणी करण्यास पाथर्डीच्या न्यायालयाने संमती दिली आहे. तिन्ही आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ केली आहे.
तिघांची हत्या करून पुरावा नष्ट करण्याचे काम तिन्ही आरोपींनी केल्याचे तपासात आढळून आले आहे. आरोपींच्या न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्याने त्यांना न्यायाधीश शिवाजी केकाण यांच्यासमोर सोमवारी हजर करण्यात आले होते. आरोपींची डीएनए चाचणी करण्यासाठी परवानगी मिळावी, असा अर्ज तपास अधिकारी पोलीस उपअधीक्षक वाय. डी. पाटील यांनी न्यायालयाकडे केला होता.
आरोपी प्रशांत जाधवच्या पायाला सूज आल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी आरोपींच्या वकिलांनी केली. त्यावर कारागृह अधीक्षकांकडे अर्ज करा, असे न्यायालयाने स्पष्ट केले. (प्रतिनिधी)