वैश्विक अनुभूतीचा लोकप्रवाह म्हणजे वारी
By Admin | Updated: May 19, 2015 01:18 IST2015-05-19T01:18:59+5:302015-05-19T01:18:59+5:30
‘‘पंढरीची वारी हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आहे. भक्तिप्रेमाची अनुभूती घेऊन सदाचारी जीवनाची वाटचाल घडविणारे ते एक नैतिकतेचे चालतेबोलते लोकविद्यापीठ आहे.

वैश्विक अनुभूतीचा लोकप्रवाह म्हणजे वारी
पुणे : ‘‘पंढरीची वारी हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आहे. भक्तिप्रेमाची अनुभूती घेऊन सदाचारी जीवनाची वाटचाल घडविणारे ते एक नैतिकतेचे चालतेबोलते लोकविद्यापीठ आहे. एकात्मतेची दिंडी निघाली. वारीच्या माध्यमातून संतांनी मानवतेचा धर्म शिकवला. समतेची पताका खांद्यावर फडकली. अवघाची संसार सुखाचा झाला, संत विचारांच्या वैश्विक अनुभूतीचा लोकप्रवाह वारीच्या रूपात वाहू लागला,’’ असे विचार संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांनी व्यक्त केले.
आल्हादिनी संस्थेच्या वतीने पौड रस्ता येथील गुरुराज सोसायटीतमधल्या गणेश सभागृहात संतविचार व्याख्यानमालेत ते ‘पंढरीची वारी’ या विषयावर बोलत होते. डॉ. देखणे म्हणाले, ‘‘ज्ञान, भक्ती, प्रीति, समाधान, संयम, श्रद्धा, शूचिता याची अनुभूती देणारे वारी हे एक महान विद्यापीठ आहे. पांडुरंग हा या विद्यापीठाचा पदसिद्ध कुलपती आहे. पुंडलिक हा आद्य कुलगुरू आहे. ज्ञानोबा-तुकोबादि संतपरंपरेने त्याचे कुलगुरूपद अभिमानाने भूषविले आहे; तर त्याच विद्यापीठातून ‘सच्चिदानंद’ पदवी घेऊन वारकरी अखंड वाटचाल करतो आहे.’’
‘आल्हादिनी’ या संस्थेच्या वतीने संतविचार व्याख्यानमालेत दोन दिवस डॉ. देखणे यांच्या ‘भारुड-गवळण’ आणि ‘पंढरीची वारी’ या विषयावरील व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते.
संस्थेच्या वतीने दीपाली दातार यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. गुरुराज सोसायटीचे श्रीकांत पाठक आणि सूर्यकांत देशपांडे यांचे व्याख्यानमालेच्या आयोजनात सहकार्य केले. (प्रतिनिधी)
४ डॉ. देखणे यांनी वारीची परंपरा, प्राचीनता, त्याचे स्वरूप, विठ्ठलभक्ती, रिंगण, धावा, त्याचे लोकजीवनातील स्थान याची माहिती देत पंढरीची वारी उभी केली.