महाराष्ट्रातील जनतेला उष्णतेचा सर्वाधिक धोका; ७५% जिल्हे ‘हाय रिस्क’मध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 12:03 IST2025-05-21T12:03:12+5:302025-05-21T12:03:51+5:30
उष्णतेच्या लाटांमुळे २०३० पर्यंत भारतातील ३.५ कोटी पूर्णवेळ नोकऱ्या जाण्याची भीती असून, जीडीपीमध्ये ४.५ टक्के घट होण्याची भीतीही अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील जनतेला उष्णतेचा सर्वाधिक धोका; ७५% जिल्हे ‘हाय रिस्क’मध्ये
मुंबई : भारताच्या एकूण लोकसंख्येच्या ७६ टक्के लोक जिथे राहतात, अशा सुमारे ५७ टक्के जिल्ह्यांतील जनता ‘उच्च’ ते ‘खूप उच्च’ उष्णतेचा धोका सहन करत आहे. भारताच्या ३/४ लोकसंख्येला गंभीर उष्णतेचा धोका असून, महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि केरळातील तब्बल ७५ टक्क्यांपेक्षा अधिक जिल्हे उष्णतेच्या धोक्याच्या पातळीवर असल्याची धक्कादायक बाब ‘सीईईडब्ल्यू’ने केलेल्या अभ्यासात समोर आली आहे.
उष्णतेच्या लाटांमुळे २०३० पर्यंत भारतातील ३.५ कोटी पूर्णवेळ नोकऱ्या जाण्याची भीती असून, जीडीपीमध्ये ४.५ टक्के घट होण्याची भीतीही अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.
मुंबई, दिल्लीत सर्वाधिक धोकादायक वातावरण
मुंबई, दिल्लीसारखी शहरे सर्वाधिक धोकादायक वातावरणाचा सामना करत आहेत. लोकसंख्येची घनता, दाट इमारती आणि सामाजिक-आर्थिक आणि आरोग्य समस्या उष्णतेचे धोके वाढवतात. उच्च तापमान आणि आरोग्य बिघडण्याच्या तक्रारी आंध्र प्रदेश, महाराष्ट्रात सर्वाधिक होत आहेत. ४१७ अति उच्च जोखीम श्रेणींमध्ये येत आहेत.
सर्वाधिक उष्णतेचा धोका येथे...
दिल्ली, महाराष्ट्र, गोवा, केरळ, गुजरात, राजस्थान, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश ही राज्ये सर्वाधिक उष्णतेचा धोका सहन करत आहेत. महाराष्ट्रातील विदर्भात उष्णतेबाबत अत्यंत संवेदनशील स्थिती आहे.
२०२४ हे भारतात आणि जागतिक स्तरावर आतापर्यंतचे सर्वात गरम वर्ष ठरले.
२७-२८ फेब्रुवारी रोजी देशात पहिली उष्णतेची लाट आली.
१,६६,००० हून अधिक लोकांचा मृत्यू १९९८ ते २०१७ दरम्यान उष्णतेच्या लाटांमुळे
झाला आहे.
४८,००० हून अधिक उष्माघाताचे रुग्ण १५९ जणांचा उष्माघातामुळे २०२४ मध्ये मृत्यू झाला.
रात्रीची थंडी गायब, उष्ण रात्री वेगाने वाढल्या
चिंताजनक बाब म्हणजे, खूप उष्ण रात्रींची संख्या आणखी वाढत आहे, ज्यामुळे आरोग्य धोके निर्माण होत असून, गेल्या दशकात अतिशय उष्ण दिवसांपेक्षा रात्रींची संख्या वेगाने वाढत आहे.
अत्यंत उष्ण रात्रींमध्ये वाढ ही सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या (१० लाखांहून अधिक) जिल्ह्यांमध्ये दिसून येते. गेल्या दशकात, मुंबईत प्रत्येक उन्हाळ्यात १५ अतिरिक्त अति उष्ण रात्री, बंगळुरू (११), भोपाळ आणि जयपूर (प्रत्येकी ७), दिल्ली (६) आणि चेन्नई (४) अशी वाढ झाली आहे.
रात्रीचे उच्च तापमान धोकादायक मानले जाते कारण शरीराला थंड होण्याची संधी मिळत नाही. थंड असलेल्या हिमालयीन भागामध्येही खूप उष्ण दिवस आणि खूप उष्ण रात्री वाढल्या आहेत. याचा परिणाम नाजूक पर्वतीय परिसंस्थांवर गंभीरपणे होऊ शकतो. गर्भवती महिला, वृद्ध, लहान मुले, बाहेर काम करणारे मजूर, आणि दीर्घकालीन आजार असणारे रुग्ण यांना उषण्तेचा सर्वाधिक धोका आहे.
सर्वाधिक फटका कुणाला? : तीव्र आणि वारंवार येणाऱ्या उष्णतेच्या लाटा देशातील कमी उत्पन्न गटातील कुटुंबांना संकटात टाकत आहेत. त्यांना बहुतेकदा पाणी आणि थंड पाण्याची कमतरता असते आणि कडक उन्हात काम करणाऱ्या कामगारांच्या सहनशक्तीची यावेळी परीक्षा असते.