"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 10:25 IST2026-04-11T10:21:30+5:302026-04-11T10:25:19+5:30
अशोक खरातच्या कृत्यांमुळे दिल्लीत महाराष्ट्राची चेष्टा झालीय अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी नाराजी व्यक्त केली.

"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
Supriya Sule on Ashok Kharat: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्या कारनाम्यांचे पडसाद आता दिल्लीपर्यंत उमटले आहेत. खरातचे अनेक बड्या राजकारण्यांसोबतचे फोटो आणि काही आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आल्यानंतर महाराष्ट्रासह देशभरात या प्रकरणाची चर्चा सुरू आहे. या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी अत्यंत कडक शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली असून, खरातसारख्या प्रवृत्तींमुळे आम्हाला मान खाली घालावी लागतेय, असे म्हटले आहे.
नाशिकच्या अशोक खरात या भोंदू बाबाची रोज नवीन प्रकरणे समोर येत आहेत. स्वतःला आध्यात्मिक शक्ती असलेला बाबा म्हणवून घेणाऱ्या खरातने अनेक महिलांची फसवणूक केल्याचे आणि त्यांच्यासोबत अश्लील कृत्ये केल्याचे काही व्हिडिओंमधून समोर आले आहेत. सोशल मीडियावर हे व्हिडीओ व्हायरल झाल्याने सर्वत्र या प्रकरणाची चर्चा होऊ लागली आहे. महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेते खरातच्या पाया पडताना किंवा त्याच्यासोबत चर्चा करताना दिसत आहेत. यामध्ये सर्वच पक्षाच्या नेत्यांचा समावेश असल्याचे बोलले जात आहे.
सुप्रिया सुळेंनी सांगितली दिल्लीतील व्यथा
सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणामुळे दिल्लीत मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगितले आहे. त्यांनी आपली खंत व्यक्त करताना म्हटले की, "खरात प्रकरण हे माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे. पुरोगामी महाराष्ट्राला हा खूप मोठा धक्का आहे. देशात या खराताने महाराष्ट्राची चेष्टा करुन ठेवली आहे. दिल्लीत काम करत असताना बाकीच्या राज्यांमधील लोक, खासदार सातत्याने मला भेटत असतात. ते चेष्टा करायला लागलेत की तुमच्या महाराष्ट्रात काय चाललंय म्हणून. ज्या प्रकारे लोकांचे व्हिडीओ येत आहेत हे खूप दुर्दैवी आणि अस्वस्थ करणारे आहे. आपण सगळ्यांनीच याचे आत्मचिंतन केले पाहिजे."