लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नका- मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2018 16:27 IST2018-07-02T16:26:44+5:302018-07-02T16:27:39+5:30
मुलं पळवण्याच्या संशयावरून धुळ्यात जमावानं पाच जणांची ठेचून हत्या केली.

लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नका- मुख्यमंत्री
धुळे- मुलं पळवण्याच्या संशयावरून धुळ्यात जमावानं पाच जणांची ठेचून हत्या केली. या प्रकरणात आतापर्यंत 23 जणांना अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची नुकसानभरपाई घोषित केली आहे. लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
साक्री तालुक्यामधील राईनपाडा या आदिवासी पाड्यावर (1 जुलै) पाच जणांची हत्या करण्यात आली. मुलं पळवणारी टोळी गावात आल्याची अफवा पसरल्यानंतर आक्रमक झालेल्या जमावानं हे राक्षसी कृत्य केलं. राईनपाडा या आदिवासी गावात काल आठवडे बाजार भरला होता. या बाजारात काहीजण फिरत होते.
यावेळी गावात मुलं पळवणारी टोळी आल्याचा संशय काहींना आला. यानंतर तशी अफवा गावात पसरली आणि जमावानं पाच जणांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत पाचही जणांचा मृत्यू झाला. यानंतर त्यांचे मृतदेह जमावानं ग्रामपंचायतीच्या कार्यालयात आणून टाकले.