‘मार्च एंड’मुळे रखडली ७ लाख जणांची पेन्शन, ५ तारखेपर्यंत जमा होण्याची शक्यता

By संकेत शुक्ला | Published: April 3, 2024 07:52 AM2024-04-03T07:52:01+5:302024-04-03T07:52:37+5:30

Pension: राज्यातील शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात यंदा दोन तारीख उलटूनही सेवानिवृत्ती वेतन जमा न झाल्याने जिल्हा कोषागार कार्यालयात त्यांचे दूरध्वनी खणखणू लागले आहेत. मात्र, मार्च एंडच्या धावपळीमुळे हा निधी जमा होण्यास विलंब झाल्याने गुरुवारपर्यंत (दि. ४) पेन्शन खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

Pension of 7 lakh people stalled due to 'March end', possibility of accumulation till 5th | ‘मार्च एंड’मुळे रखडली ७ लाख जणांची पेन्शन, ५ तारखेपर्यंत जमा होण्याची शक्यता

‘मार्च एंड’मुळे रखडली ७ लाख जणांची पेन्शन, ५ तारखेपर्यंत जमा होण्याची शक्यता

- संकेत शुक्ल
नाशिक - राज्यातील शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात यंदा दोन तारीख उलटूनही सेवानिवृत्ती वेतन जमा न झाल्याने जिल्हा कोषागार कार्यालयात त्यांचे दूरध्वनी खणखणू लागले आहेत. मात्र, मार्च एंडच्या धावपळीमुळे हा निधी जमा होण्यास विलंब झाल्याने गुरुवारपर्यंत (दि. ४) पेन्शन खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. सुमारे अडीच हजार कोटी रुपयांची पेन्शन रक्कम सध्या रखडली आहे.

राज्य शासनाच्या अखत्यारीत असलेल्या संस्थांमध्ये तसेच निम्न सरकारी कार्यालयातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या सेवानिवृत्ती वेतनाला तांत्रिक अडचणींमुळे विलंब झाला आहे. मार्च एंड आणि ई-कुबेर यंत्रणा अद्ययावतीकरण यामुळे वेळेत निधी न मिळाल्याने ही रक्कम पेन्शनधारकांच्या खात्यावर जमा होऊ शकली नाही. त्यामुळे राज्यातील प्रत्येक कोषागार कार्यालयात त्याबाबत चौकशी करण्यात येत असून, पेन्शन जमा होण्यासाठी वेगवेगळ्या कार्यालयांत सरासरी ६ तारखेचा अवधी लागू शकेल, असे सांगितले जात आहे. राज्यातील २७ कोषागार कार्यालयांमध्ये सुमारे ६ लाख ७५ हजार निवृत्त कर्मचारी आहेत.

सेवानिवृत्त कामगारांचे जीवन निवृत्ती वेतनावर अवलंबून असते. त्यावरच त्यांची उपजीविका असल्याने हे वेतन जमा न झाल्याने अनेक ज्येष्ठांनी कोषागार 
कार्यालयात धाव घेतली होती. यातील तांत्रिक अडचण दूर झाली असून, मंगळवारी हा निधी कोषागार कार्यालयांना वितरित करण्यात आला आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत पेन्शन खात्यावर वितरित होईल, अशी माहिती अप्पर कोषागार अधिकारी रमेश शिसव यांनी दिली.

काय घ्यावी खबरदारी?
- जिल्हा कोषागार कार्यालयातून सर्व निवृत्ती वेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतन धारकांची मासिक पेन्शन यापुढे शासनाच्या ई-कुबेर प्रणाली मार्फत भारतीय रिझर्व्ह बँकेतून थेट पेन्शनधारकांच्या खात्यात जमा होणार आहे, अशी माहिती रमेश शिसव यांनी दिली. 
- ज्या पेन्शनधारकांनी परस्पर बँक खात्यात बदल करून घेतले असतील, त्यांनी त्यांचे मूळ बँक खाते ज्या ठिकाणी असेल, तेच खाते सुरू ठेवावे, भविष्यात पेन्शनबाबत अडचणी निर्माण होऊ नयेत, यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

Web Title: Pension of 7 lakh people stalled due to 'March end', possibility of accumulation till 5th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.