मेडिक्लेम खोटा ठरवणा-या विमा कंपनीला दंड
By Admin | Updated: August 16, 2014 02:24 IST2014-08-16T02:24:24+5:302014-08-16T02:24:24+5:30
खोटे आणि तोंडी कारण देत विमादावा नाकारणाऱ्या रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी आणि मेडिअसिस्ट इंडिया प्रा.लि. या कंपन्यांना जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने ४ लाखांचा दंड ठोठावला आहे.

मेडिक्लेम खोटा ठरवणा-या विमा कंपनीला दंड
ठाणे : ग्राहकाने विमा पॉलिसी घेताना वैयक्तिक माहिती लपवली होती, असे खोटे आणि तोंडी कारण देत विमादावा नाकारणाऱ्या रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी आणि मेडिअसिस्ट इंडिया प्रा.लि. या कंपन्यांना जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने ४ लाखांचा दंड ठोठावला आहे.
भार्इंदर येथे राहणारे अरविंदभाई जैन यांनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी आणि मेडिअसिस्ट इंडिया प्रा.लि. यांच्याकडून मेडिक्लेम विमा पॉलिसी घेतली होती. ही पॉलिसी वैध असताना मार्च २००९ ते मार्च २०१० दरम्यान जैन यांना हृदयरोगाचा त्रास होऊ लागल्याने त्यांच्यावर बायपासची शस्त्रक्रिया केली होती. त्यानुसार, या संपूर्ण खर्चाचा विमादावा जैन यांनी मेडिअसिस्ट इंडिया प्रा.लि. यांच्याकडे पाठवला होता. परंतु, हा दावा खोटा असल्याचे सांगत कंपनीने तो नाकारला. त्यामुळे जैन यांनी ३ लाख ६९ हजार १८ टक्के व्याजासह ५० हजार नुकसानभरपाई आणि १५ हजार तक्रार खर्च मिळावा, असा मंचकडे तक्रार केली होती. त्यावर मेडिअसिस्ट इंडिया प्रा.लि. कंपनीने कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही. रिलायन्स जनरल इन्शुरन्सने मात्र पॉलिसी घेताना जैन यांनी वैयक्तिक माहिती लपवली होती, असे सांगितले. तसेच खाजगी प्रतिनिधीतर्फे जैन यांच्या उपचाराबाबत चौकशी केली असता त्यांनी स्वास्थ्यासंबंधी माहिती लपवल्याचा पुरावा मिळाल्याचे सांगून दावा नाकारला. परंतु इन्शुरन्स कंपनीस्रैया चौकशीचा अहवाल जैन यांना देणे अपेक्षित होते. मात्र, कंपनीने अहवालाची प्रत त्यांना दिली नाहीच, शिवाय मंचकडेही पुरावा म्हणून दाखल केली नाही. महत्त्वाची बाब लपवल्याचे कागदोपत्री सिद्ध करणे अपेक्षित होते. त्यामुळे कागदपत्रे, स्पष्टीकरण आणि इतर बाबी विचारात घेता केवळ तोंडी सांगून दावा नाकारता येत नाही, असे ग्राहक मंचने स्पष्ट केले. (प्रतिनिधी)