शेतकऱ्यांना पीक कर्ज !

By Admin | Updated: July 20, 2016 04:20 IST2016-07-20T04:20:29+5:302016-07-20T04:20:29+5:30

आतापर्यंत १३७ कोटी २५ लाख रुपयांचे पीक कर्जवाटप केल्याचा दावा ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (टीडीसीसी) बँकेने केला आहे.

Peak loans to farmers! | शेतकऱ्यांना पीक कर्ज !

शेतकऱ्यांना पीक कर्ज !

सुरेश लोखंडे,

ठाणे- खरिपाचे पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांना होत असलेली आर्थिक चणचण दूर करण्यासाठी ठाणे व पालघर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना आतापर्यंत १३७ कोटी २५ लाख रुपयांचे पीक कर्जवाटप केल्याचा दावा ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (टीडीसीसी) बँकेने केला आहे.
या वर्षी दोन्ही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची आर्थिक समस्या दूर करण्यासाठी रब्बी कर्जापोटी ४५ कोटी, तर खरीप कर्जापोटी १६५ कोटी ८० रुपये वाटप करण्याचे नियोजन टीडीसीसी बँकेने केले आहे. यापैकी २६ हजार २१ शेतकऱ्यांना १३७ कोटी २५ लाखांचे खरीप पीककर्जवाटप केले आहे. २४ हजार ८१० हेक्टर शेतातील पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांना हा कर्जपुरवठा केला असल्याचे टीडीसीसी बँकेचे अध्यक्ष बाबाजी पाटील यांनी लोकमतला सांगितले.
ठाणे जिल्ह्यातील १५ हजार ६०३ शेतकऱ्यांनी त्यांच्या १३ हजार २१९ हेक्टर शेतावरील पिकांच्या उमेदीवर ७४ कोटी ५४ लाख रुपये कर्ज घेतले आहे. तर, पालघर जिल्ह्यातील १० हजार ४१८ शेतकऱ्यांनी ११ हजार ५९० शेतीवर ६२ कोटी ७० लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे. उर्वरित शेतकऱ्यांनादेखील या पीककर्जाचा लाभ ३० सप्टेंबरपर्यंत घेता येणार आहे. तर, पंतप्रधान पीकविम्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ३१ जुलैपर्यंत बँकेत अर्ज दाखल करणे अपेक्षित असल्याचे टीडीसीसी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भगीरथ भोईर यांनी नमूद केले.
>बँकेच्या ५९ शाखांद्वारे कर्जवाटप; पालघरमध्येही ३० शाखा
शेतकऱ्यांना टीडीसीसी बँकेच्या ५९ शाखांद्वारेच पीककर्जाचे वाटप होत आहे. यासाठी ठाणे जिल्ह्यात २९ शाखा असून पालघर जिल्ह्यात ३० शाखा शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करीत आहेत.
जिल्ह्यातील भात या प्रमुख पिकापोटी हेक्टरी ६० हजार रुपये व नागली पिकाकरिता हेक्टरी ३५ हजार रुपये कर्ज शेतकऱ्यांना दिले जात आहे.
यानुसार, या आर्थिक वर्षात रब्बी व खरीप पिकांसाठी ठाणे जिल्ह्यात ९० कोटी ८१ लाख, तर पालघर जिल्ह्यात १२० कोटी रुपये पीककर्जवाटप करण्याचा लक्ष्यांक बँकेने निश्चित केला आहे.
>भातलागवडीला विलंब; केवळ ३० टक्के लागवड
जिल्ह्यात आतापर्यंत ८० टक्के भातलागवड होणे अपेक्षित होते. मात्र, केवळ ३० टक्के क्षेत्रात लागवड झाली असून संततधार पावसामुळे भातलागवडीस विलंब होत असल्याच्या वृत्तास जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी डॉ. प्रफुल्ल बनसोडे यांनी दुजोरा दिला आहे.
जिल्ह्यात ६० हजार ७१७ हेक्टर क्षेत्रावर यंदा भातलागवड होणार आहे. यापैकी केवळ ३० टक्के म्हणजे २० हजार हेक्टर क्षेत्रावर आतापर्यंत लागवड झाली आहे. उर्वरित क्षेत्रात आठवडाभरात लागवड होणे अपेक्षित आहे. पाऊस एक आठवडा उशिरा सुरू झाला, त्यामुळे लागवडीला विलंब झाला.
जिल्ह्यात सध्या भातरोपे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून ती दर्जेदार आहेत. यासाठी ११ हजार २६९ क्विंटल दर्जेदार भातबियाण्यांचा पुरवठा करण्यात आला आहे. याशिवाय, पावसाचे प्रमाणही चांगले असल्यामुळे यंदा हेक्टरी दोन हजार ५०८ किलो भाताची उत्पादकता अपेक्षित असून जिल्हाभरात सुमारे एक लाख ५२ हजार २७८ मेट्रीक टन भाताच्या उत्पादनाचा अंदाज आहे.

Web Title: Peak loans to farmers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.