वांबोरी/ राहुरी (अहमदनगर) : वांबोरी येथे युवकाची विवस्त्र धिंड काढल्याच्या प्रकरणानंतर शनिवारी दुसऱ्या दिवशी गावातील मुख्य बाजारपेठ बंद होती. पीडित तरुणावर नगरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शारीरिक आणि मानसिक आघातातून तो अद्याप सावरलेला नाही. सरपंच उदयसिंह पाटील यांनी गुरुवारी हे प्रकरण समोपचाराने मिटवले होते. शनिवारी सकाळी ११ वाजता राहुरी शहरातून विविध संघटनांच्यावतीने तहसील कचेरीवर मोर्चा काढण्यात आला़ तसेच गावातील व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार बंद ठेवत, घटनेचा निषेध व्यक्त केला. तसेच आरोपींना कठोर शासन व्हावे, अशी मागणी केली. दुपारी पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री राम शिंदे, विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे, खा. दिलीप गांधी, आ. शिवाजी कर्डिले यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. ही घटना निंदनीय असून आरोपींना कडक शासन होईल, अशी कलमे लावण्यात आली असल्याचे शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.२७ जणांविरूध्द दरोड्याचा गुन्हा या प्रकरणी शुक्रवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात २७ जणांना आरोपी करण्यात आले. शनिवारी दुपारी पीडित तरुणाच्या आईने मात्र, दरोडा टाकून पाच तोळ्याचे सोने नेल्याची फिर्याद राहुरी पोलीस स्टेशनमध्ये दिली़ यामुळे पोलिसांनी २७ आरोपींविरोधात दरोड्याचा गुन्हाही दाखल केला.
तरुणाच्या नग्न धिंड प्रकरणी वांबोरीत तणावपूर्व शांतता
By admin | Updated: March 15, 2015 01:27 IST