‘सुरक्षारक्षक मंडळातील कर्मचाऱ्यांना ७ तारखेला वेतन द्या’
By Admin | Updated: August 2, 2016 05:30 IST2016-08-02T05:30:23+5:302016-08-02T05:30:23+5:30
सर्व जिल्ह्यांतील सुरक्षा रक्षक मंडळांत काम करणाऱ्या कामगारांना दर महिन्याच्या ७ तारखेला वेतन देण्याची जबाबदारी सुरक्षा रक्षक मंडळाची

‘सुरक्षारक्षक मंडळातील कर्मचाऱ्यांना ७ तारखेला वेतन द्या’
मुंबई : सर्व जिल्ह्यांतील सुरक्षा रक्षक मंडळांत काम करणाऱ्या कामगारांना दर महिन्याच्या ७ तारखेला वेतन देण्याची जबाबदारी सुरक्षा रक्षक मंडळाची असून, प्रत्येक कर्मचाऱ्याला ७ तारखेला वेतन देण्यात यावे, असे निर्देश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. विधानभवानातील कामगार मंत्र्यांच्या कक्षात कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या उपस्थितीत सोमवारी झालेल्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते.
माथाडी बोडामार्फत शासकीय कार्यालयांना सुरक्षा रक्षक त्यांच्या मागणीनुसार पुरवण्यात येतात. मात्र शासकीय विभागाकडून वेळेवर निधी मिळत नाही. परिणामी वेतनाला विलंब होतो, असे बैठकीवेळी अधिकारी वर्गाकडून सांगण्यात आले.
वास्तविक शासकीय विभागाकडून दिलेल्या सेवेचा निधी वसूल करणे अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांनी तो वसूल करावा आणि कर्मचाऱ्यांना ७ तारखेला द्यावे, असे निर्देश बैठकीत देण्यात आले.
राज्यात २८ सुरक्षा रक्षक मंडळे आहेत. या अंतर्गत २८ लाख लोक काम करतात. माथाडी आणि सुरक्षा रक्षक हे दोन वेगळे विभाग आहेत. सर्व सुरक्षा रक्षक मंडळे महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक महामंडळात सहभागी करुन घेण्यात यावी. याबाबत शासनाने एक कायदा तयार केला आहे. त्या कायद्याची अद्यापही अंमलबजावणी झालेली नाही. सुरक्षेचे काम माथाडी बोर्डाकडून काढून शासनाच्या सुरक्षा महामंडळाकडे देण्यात यावे. याकरिता कामगार मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आठ दिवसांत बैठक घ्यावी, अशी सूचनाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी केली. (प्रतिनिधी)
>कामगारांनी वाचला तक्रारींचा पाढा
शासनाने एकाच वेळी घेतलेला निर्णय सर्व बोर्डांना लागू होणे गरजेचे आहे. मात्र तसे होत नाही. सुरक्षा रक्षकांना गणवेश पुरवला जात नाही. रात्रपाळीचा भत्ता दिला जात नाही, अशा अनेक तक्रारी बैठकीवेळी कामगारांनी केल्या. यावर माथाडी बोर्ड आणि सुरक्षा रक्षक मंडळाच्या कार्यप्रणालीवर आठ दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेण्याची सूचना ऊर्जामंत्र्यांनी केली.