ऑनलाइन टीम
मुंबई, दि. ११ - महाराष्ट्रातील दारूण पराभवानंतर शरद पवारांचा ताळतंत्र सुटला असून ते पाकिस्तानच्या हाफीज सईदप्रमाणे काहीही बरळू लागले आहेत, अशी टीका शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी 'सामना'तून पवारांवर केली आहे. फेसबुकवरील महापुरुष विटंबना प्रकरणाने हिंसक वळण घेतल्यानंतर त्यातून पुण्यातील एका तरुणाची हत्या झाली होती. त्याबद्दल बोलताना 'दिल्लीत मोदींचे सरकार आल्यामुळे महाराष्ट्रातील अशा शक्तींनी डोके वर काढले आहे व त्यांची हिंमत वाढली' असे वक्तव्य राष्ट्रवादीच काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले होते. त्याच पार्श्वभूमीवर शिवसनेचे मुखपत्र असणा-या सामनातून शरद पवारांवर तोफ डागण्यात आली आहे.
महाराष्ट्रात जी हत्या झाली त्याचा मोदींशी काही संबंध नाही. राज्यात पवारांचे राज्य, त्यांच्या पक्षाचा गृहमंत्री असताना अशी हत्या होणे हे त्यांच्या सरकाराचे अपयश असल्याची टीका लेखात करण्यात आली आहे. पुण्यात नरेंद्र दाभोलकरांच्या झालेल्या हत्येला वर्ष होत आले तरीही पवारांच्या सरकारला दाभोलकरांचे मारेकरी अद्याप शोधता आलेले नाहीत, असेही लेखात म्हटले आहे. तसेच पवारांचे ‘उजवे हात’ जितेंद्र आव्हाड हे मुंब्रा परिसरात पोलिसांना गुंडापुंडांवर कारवाई करू देत नाहीत. कारण हे गुंड एका विशिष्ट धर्माचे असतात. पोलिसांना अर्वाच्य शिव्या देऊन त्यांना हाकलून दिले जाते. राज्यात मोदींचे सरकार नाही तरीही अशा आव्हाडी प्रवृत्तीच्या लोकांची हिंमत वाढते, यावर पवारांचे काय म्हणणे आहे? असा सवालही लेखात विचारण्यात आला आहे.
पुण्यात झालेल्या खुनाची जबाबादारी ही राज्य सरकारवर असून मोदींवर त्यांचे खापर फोडून पवार स्वत:चे हसे करून घेत आहेत. पवारांनी अतिरेकी हाफीज सईदप्रमाणे वाट्टेल तशी गरळ ओकू नये व स्वत:ची उरलीसुरली प्रतिष्ठा धुळीस मिळवू नये, असेही लेखात म्हटले आहे.