अणुऊर्जेतून जगाला शांततेची दिशा
By Admin | Updated: May 27, 2015 01:07 IST2015-05-27T01:07:02+5:302015-05-27T01:07:02+5:30
अणुबॉम्बचा शोध लागल्यानंतर त्याचा वापर करून जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकी ही दोन्ही शहरे बेचिराख करण्यात आली.

अणुऊर्जेतून जगाला शांततेची दिशा
पुणे : अणुबॉम्बचा शोध लागल्यानंतर त्याचा वापर करून जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकी ही दोन्ही शहरे बेचिराख करण्यात आली. यात अनेक निष्पापांचा बळी गेला. तेव्हा ही घटना जगभरातील अणुशास्त्रज्ञांच्या जिव्हारी लागली आणि अणुऊर्जा निर्माण करावी की नाही यावर चर्चा सुरू झाल्या. तेव्हा भारतातील अणुऊर्जेचे जनक असलेल्या डॉ. होमी भाभा यांनी त्या काळात जिनिव्हा येथे झालेल्या जगभरातील शास्त्रज्ञांच्या परिषदेत अणुऊर्जेतून जगात शांतता कशा प्रकारे प्रस्थापित करता येऊ शकेल, याची दिशा दिली. भाभा हे खऱ्या अर्थाने जगमान्य अणुशास्त्रज्ञ होते, असे मत ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. शंकरराव गोवारीकर यांनी व्यक्त केले.
फिरोदिया फाउंडेशन, संवाद आणि यशवंत प्रकाशन यांच्या वतीने रामचंद्र कुलकर्णी लिखित डॉ. होमी भाभा व डॉ. विक्रम साराभाई यांच्या जीवनावरील व सिक्स गोल्डन लीवज् आॅफ इंडियन न्युक्लिअर सागा या तीन पुस्तकांच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते.
मराठा चेंबरच्या सभागृहात मंगळवारी कार्यक्रम झाला. ज्येष्ठ उद्योजक अरुण फिरोदिया, डॉ. जयश्री फिरोदिया व रामचंद्र कुलकर्णी व्यासपीठावर होते. भारतीय हवाई दलातील योगदानाबद्दल धुंडिराज कुलकर्णी, प्रभाकर कुलकर्णी व रामचंद्र कुलकर्णी यांचा या वेळी सत्कार करण्यात आला.
गोवारीकर म्हणाले, ‘‘जगात अणुऊर्जेचा शोध लागण्यापूर्वी होमी भाभा यांनी त्यात संशोधनास सुरुवात केली होती. त्यांचे ‘कॉस्मिक रे’वरील संशोधन अतुल्य होते. त्याबद्दल खरेतर त्यांना नोबेल पारितोषिक मिळायला हवे होते. त्यांचे व्यक्तिमत्त्व अद्वितीय होते. त्यांच्यावर तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी विश्वास दाखविल्याने भाभा यांनी भारताच्या अणुऊर्जेची पायाभरणी केली.’’ (प्रतिनिधी)
४अरुण फिरोदिया म्हणाले, ‘‘होमी भाभा, विक्रम साराभाई यांनी दाखविलेल्या पथावर चालल्यामुळे जगात भारताला महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. भाभा यांचा मृत्यू संशयास्पद होता. अमेरिकेच्या इंटेलिजन्स ब्युरोनेही ते मान्य केले आहे. जर भाभांचा अपघाती मृत्यू झाला नसता तर आज अणुऊर्जेच्या माध्यमातून भारत अमेरिकेपेक्षाही प्रगत झालेला असता. ज्या काळात भारतात बैलगाडीचा वापर केला जात होता, त्या १९५६च्या काळात भारतात अणुऊर्जेचे रिअॅक्टर भाभांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आले होते. त्या काळात फक्त युरोपमध्येच असे रिअॅक्टर होते. यावरून भाभा यांचे कर्तृत्व सिद्ध होते. आज आपण अणुऊर्जेने सज्ज असल्याने कोणताही देश आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहू शकत नाही.