प्रवाशांनो, समस्या असेल तर तक्रार करा!

By Admin | Updated: August 16, 2014 02:27 IST2014-08-16T02:27:49+5:302014-08-16T02:27:49+5:30

कोकण रेल्वे मार्गावरील ट्रेनमधून प्रवास करताना अनेक प्रवाशांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते

Passengers, if you have problems, report it! | प्रवाशांनो, समस्या असेल तर तक्रार करा!

प्रवाशांनो, समस्या असेल तर तक्रार करा!

मुंबई : कोकण रेल्वे मार्गावरील ट्रेनमधून प्रवास करताना अनेक प्रवाशांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते. अशा वेळी समस्या सतावत असतानाही त्याची तक्रार प्रवाशांना रेल्वे प्रशासनाकडे करता येत नाही. प्रवाशांना सतावणारी ही समस्या पाहता तक्रार करण्यासाठी कोकण रेल्वेने एसएमएस सेवा १५ आॅगस्टपासून सुरु केली आहे.
खानपान सेवा आणि टॉयलेटची व्यवस्था बरोबर नसणे, डब्यांमध्ये अस्वच्छता असणे, फेरीवाले, तृतीयपंथीयांकडून त्रास होणे या आणि अनेक कारणांमुळे प्रवाशांचा प्रवास त्रासदायक होत असतो. याचबरोबर प्रवाशांना स्थानकात असल्यास ट्रेन वेळेवर नसणे, पाण्याची आणि खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सची व्यवस्था नसणे अशा समस्यांनाही तोंड द्यावे लागते. याबाबत स्टेशन मास्तरकडे तक्रार नोंदवल्यास ती तक्रार रेल्वेच्या वरिष्ठ पातळीवर पोहोचेलच असे नाही. तसेच त्याचे निराकरण त्वरित होणेही अशक्य असल्याचे दिसून येते. प्रवाशांच्या या सर्व समस्या पाहता कोकण रेल्वेने प्रवाशांच्या तक्रार निवारणासाठी या मार्गावर एसएमएस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ही सेवा १५ आॅगस्टपासून कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यासाठी ९००४४७०७० या मोबाईल नंबर प्रवाशांसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. प्रवाशांनी पाठवलेल्या एसएमएसची दखल कोकण रेल्वेच्या बेलापूर, नवी मुंबईस्थित कंट्रोल रुममध्ये २४ तास घेतली जाणार असल्याचे कोकण रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी वैशाली पतंगे यांनी सांगितले. या नंबरवर फक्त एसएमएस पाठवण्याची सोय असून फोन करुन बोलता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले. या क्रमांकावर प्रवाशांची तक्रार आल्यास तात्काळ संबंधित विभागाला त्याची माहीती दिली जाईल आणि प्रवाशाच्या समस्येचे निराकरण केले जाईल, असे कोकण रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Passengers, if you have problems, report it!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.