डाऊनफॉल या शब्दावरून राजकारण चांगलंच तापले. बारामतीत काँग्रेसने उमेदवार दिल्याने खासदार पार्थ पवारांनी थेट वार केला. त्यानंतर काँग्रेसकडूनही पलटवार करण्यात आला. यात आता पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी उडी घेतली आहे. पार्थ पवार बरोबरच बोलले आहेत, असे म्हणत अमोल मिटकरींनी काँग्रेस १६ आमदारांचा पक्ष म्हणत हिणवलं आहे.
आमदार अमोल मिटकरी यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. ज्यात ते म्हणाले, "पार्थदादा, u are absolutely right! (तुम्ही अगदी बरोबर आहात.) आमच्या पक्षाचे नेते खासदार पार्थ पवार यांचं वक्तव्य काँग्रेसला फारच झोंबलेलं दिसतंय."
मिटकरी म्हणाले, "सत्ताधारी काँग्रेस १६ च्या आकड्यावर थांबलीये"
"काँग्रेसचा 'डाऊनफॉल' सुरू असल्याच्या पार्थ पवारांच्या वक्तव्यावर एरव्ही डबक्यात लपून बसलेली बेडकं बाहेर पडत एकदम 'डऱ्याव-डऱ्याव' करत बोंबलायला लागलीत. कधीकाळी राज्यात सत्ताधारी असलेली काँग्रेस आज विधानसभेत १६ च्या आकड्यावर थांबलीय", अशा शब्दात मिटकरींनी काँग्रेसला डिवचले.
काँग्रेसचा डाऊनफॉलच सुरूये -मिटकरी
"१६ हा आकडा नेहमीच धोक्याचा असतो, असं जाणकारांना माहित आहे. त्यामुळेच पार्थ पवारांनी असं वक्तव्य केलेलं असावं. मात्र, आपलं वर्तमान आणि अस्तित्व गमावलेल्या अन् विसरलेल्या काँग्रेसला आता इतिहासाचाही अभ्यास करावा लागेल हे नक्कीच. पार्थदादा!, तुम्ही अगदी खरं बोललेत. काँग्रेसचा 'डाऊन फॉल'च सुरू आहे", असे म्हणत अमोल मिटकरींनी पार्थ पवारांच्या विधानाला जाहीर समर्थन असल्याचे सांगितले.
नाना पटोलेंची पार्थ पवारांना सुनावले
काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोल म्हणाले की, "पार्थ पवार काय बोलतोय, यावर लक्ष देण्यापेक्षा या निवडणुकीची प्रक्रिया... निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, असे त्यांचे मत आहे. त्यांच्या आईने (सुनेत्रा पवार) आमच्या प्रदेशाध्यक्षांना कॉल केला आहे. पण, अशा प्रकारे दबाव तंत्रांचा वापर करून आणि काँग्रेसवर टीका करून प्रश्न सुटणार नाही."
"पार्थ पवार आमच्यापेक्षा वयाने लहान आहेत. त्यामुळे मला त्यांच्यावर काही प्रतिक्रिया देण्याचे कारण नाही. कुणाचा डाऊनफॉल होईल, हे वेळच सांगेल. त्यामुळे त्यावर प्रतिक्रिया मला द्यायचीच नाही", असे नाना पटोले म्हणाले.
Web Summary : Amol Mitkari supports Partha Pawar's 'downfall' comment about Congress, calling it a party of 16 MLAs. Nana Patole dismisses Pawar's remarks, emphasizing election process and Sunetra Pawar's call.
Web Summary : अमोल मिटकरी ने कांग्रेस पर पार्थ पवार की 'डाउनफॉल' टिप्पणी का समर्थन किया, इसे 16 विधायकों की पार्टी कहा। नाना पटोले ने पवार की टिप्पणी को खारिज करते हुए चुनाव प्रक्रिया और सुनेत्रा पवार के फोन पर जोर दिया।