Parth pawar's driver was kidnapping by unknown person | पार्थ पवार यांच्या चालकाचे अपहरण करून दिले बेशुद्धावस्थेत सोडून
पार्थ पवार यांच्या चालकाचे अपहरण करून दिले बेशुद्धावस्थेत सोडून

ठळक मुद्देमुंबईत कुलाबा बेस्ट डेपोजवळून झाले होते अपहरण

शिक्रापूर :  माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव व मावळ लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या गाडीचा चालक मनोज ज्योतीराम सातपुते याचे मुंबईतून अपहरण करून त्याला (सुपा ता. पारनेर, जि. नगर ) येथे बेशुद्धावस्थेत सोडून देण्यात आले. अपहरणकर्त्यांनी 'तु पार्थ पवारांचा ड्रायव्हर का ? ' असे म्हणून अपहरण केल्याने कुलाबा (मुंबई) व शिक्रापूर (जि.पुणे) पोलीसही चक्रावले असून या प्रकरणी स्वतः पार्थ पवार या घटनेच्या खोलात जावून माहिती घेण्यासाठी मुंबई व पुणे जिल्हा पोलिसांच्या सतत संपर्कात आहेत.
       याबाबत चालक मनोज ज्योतीराम सातपुते ( वय २६, रा. सणसवाडी, ता. शिरूर, जि. पुणे ) याने फिर्यादीत दिलेल्या माहितीनुसार,  दि.५ रोजी रात्री ८ वाजता मुंबईत कुलाबा बेस्ट डेपोजवळ उभा असताना एक लाल रंगाची ओमनी गाडी सातपुते यांच्याजवळ आली व तू पार्थ पवारांच्या गाडीचा चालक आहेस का ? आम्हाला त्यांना भेटायचे आहे, असे म्हणून त्याला गाडीच्या पुढच्या सीटवर बसविले.

मात्र, त्यापुढील काहीच आठवत नाही असे सांगून सातपुते यांना शरीरावर काही ठिकाणी मारहाण करून थेट सुपे येथे दि. ६ रोजी सकाळी ८ वाजता सोडल्याचे आठवत असल्याचे त्यांनी पोलिसांना लिहून दिले आहे.
       दरम्यान सोबतचा मोबाईल ही त्यांचा गहाळ झाला असून ते एसटी बसने सणसवाडी येथे आले. उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल झाल्यावर त्यांनी शिक्रापूर पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यावर अज्ञातांवर अपहरण, मारहाणीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.तसेच गुन्हा कुलाबा पोलिसांकडे पुढील तपासासाठी वर्ग करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी दिली.
     दरम्यान संपूर्ण घटनेची माहिती स्वतः पार्थ पवार पोलिसांकडून घेत असून या प्रकरणाची सत्यता नेमकी काय याबाबत माहिती घेण्यासाठी ते लवकरच कुलाबा पोलिसांची भेट घेणार आहे.


Web Title: Parth pawar's driver was kidnapping by unknown person
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.