मराठी भाषेवरून राजकीय तणाव वाढलेला असताना बिहारच्या जन अधिकार पक्षाचे प्रमुख पप्पू यादव यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरेंवर जोरदार टीका केली. राज ठाकरेंनी परप्रातींयाबाबत घेतलेली भूमिका अनादरपूर्ण असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच मुंबईत येऊन राज ठाकरेंना चांगलाच धडा शिकवू, असाही इशारा त्यांनी दिला.
मराठी बोलण्याच्या मद्द्यावरून मनसे कार्यकर्त्यांनी मीरा-भाईंदरमध्ये एका व्यापाऱ्याला मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी नराजी व्यक्त केली. याच मुद्द्यावरून पप्पू यादव यांनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केला. माध्यमांशी बोलताना पप्पू यादव म्हणाले की, बिहार आणि उत्तर प्रदेशातील लोकांनी मुंबई आणि महाराष्ट्राच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. राज ठाकरे त्यांच्या पोकळ धमक्या आणि अहंकाराने त्यांचा अपमान करू शकत नाहीत. मुंबईत येऊन त्यांना चांगलाच धडा शिकवू, असा इशारा त्यांनी दिला.
पुढे पप्पू यादव म्हणाले की, अशी विधाने भारताच्या एकतेला आणि अखंडतेला हानी पोहोचवतात. मुंबई संपूर्ण देशाची आहे. ती कोणाचीही वैयक्तिक मालमत्ता नाही. भारताच्या कानाकोपऱ्यातील लोक तिथे काम करतात आणि राहतात. राज ठाकरे यांचे द्वेषाचे राजकारण आता सहन केले जाणार नाही."
मीरा भाईंदरमध्ये मराठीत न बोलणाऱ्या एका व्यापाऱ्याला मनसैनिकांनी चोप दिला होता. त्यानंतर परिसरातील अमराठी व्यापाऱ्यांनी मनसेच्या विरोधात मोर्चा काढला आणि व्यापाऱ्याला मारहाण करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कडक कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी मनसेच्या सात कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.