पापा कमिंग लेट !
By Admin | Updated: August 5, 2016 04:44 IST2016-08-05T04:44:36+5:302016-08-05T04:44:36+5:30
‘पापा वुड कमिंग लेट’ हे उद्गार आहेत महाडच्या अपघातात बेपत्ता झालेल्या जयेश गोपाळ बाणे (३६) यांच्या दोन जुळ्या मुलांचे.

पापा कमिंग लेट !
गौरी टेंबकर-कलगुटकर,
मुंबई- ‘पापा वुड कमिंग लेट’ हे उद्गार आहेत महाडच्या अपघातात बेपत्ता झालेल्या जयेश गोपाळ बाणे (३६) यांच्या दोन जुळ्या मुलांचे. आपले वडील कामावरून उशिरा परत येणार आहेत, इतकंच त्यांना माहीत आहे, कारण अद्याप त्यांचे वडील किती भयंकर अपघातात सापडले आहेत, याचा साधा अंदाजही या चिमुकल्यांना नाही.
बोरीवलीच्या बाभई नाका परिसरात असणाऱ्या द्वारका कुटीर इमारतीत राहणारे जयेश हे गोरेगावात एका खासगी कंपनीत काम करतात, बोरीवलीत ते त्यांचे वडील गोपाळ बाणे, पत्नी सायली आणि दोन जुळी मुले मयांक आणि मृण्मयी यांच्या सोबत राहत होते. बाणे यांची दोन्ही मुले इयत्ता नववीत शिकतात. सोमवारी परतणारे वडील अजून कसे घरी परतले नाहीत, असा प्रश्न ते वारंवार आई आणि आजोबांना विचारतात. तेव्हा ‘पापा वुड कमिंग लेट’, इतकंच आम्ही त्यांना सांगितल्याचे जयेशचे भावोजी महेश मेटेलू यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. घरात टीव्ही आणि पेपर बंद केलाय आणि भेटायला येणाऱ्या नातेवाइकांनीही घरात रडारड करू नये, असे बजावण्यात आल्याचे महेश यांनी नमूद केले.
रविवारी राजापूरला तहसीलदार कार्यालयात जयेश काही कामासाठी गेले. त्याच रात्री परतीच्या वाटेवर असताना त्याने साडेनऊला चिपळूणमधून फोन केला.
सकाळी दादरला पोहोचून
फोन करतो, असे सांगून फोन
ठेवला, तो अद्याप उचललेलाच
नाही, असे एका खासगी कंपनीत
काम करणाऱ्या त्यांच्या पत्नीने सांगितले.
>मामाच्या श्राद्धासाठी
गेला आणि...
महाड बस अपघातात बळी गेलेला अजून एक नाव म्हणजे प्रशांत प्रकाश माने (३३) जे जोगेश्वरीमध्ये आई, पत्नी आणि आठ महिन्यांच्या मुलीसोबत राहत होते. मामाच्या श्राद्धासाठी मिरवणे या गावी गेलेले माने हे अद्याप परतलेले नाहीत. त्यामुळे आपल्या माणसाचे नेमके काय झाले ही चिंता या कुटुंबीयांसाठी नरकयातना ठरत आहे.
माने हे सीप्झ परिसरात एका कंपनीत कामाला होते. जोगेश्वरी पूर्वच्या शिवटेकडी परिसरातील शाळेजवळ ते पत्नी सुषमा, आठ महिन्यांची मुलगी, आई प्रतिभा यांच्यासोबत राहत होते. घरात कमविणारे ते एकटेच असल्याने हे कुटुंब त्यांच्यावर अवलंबून होते. मामाचे श्राद्ध असल्याने प्रशांत मिरवणे या त्यांच्या गावी गेले होते. आम्हाला अपघाताची बातमी समजली. तेव्हापासून त्यांना आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहोत, असे सुषमा यांनी सांगितले.