पनवेल शहरातील तक्का परिसरात बास्केटमध्ये नवजात अर्भक आढळल्याने एकच खळबळ उडाली. पोलिसांनी या नवजात अर्भकाला रुग्णालयात दाखल केले. २८ जून रोजी पहाटेच्या सुमारास पनवेल मधील तक्का परिसरात अज्ञात व्यक्तीने नवजात अर्भकाला बास्केटमध्ये ठेवले. या बास्केटमध्ये काहीतरी दिसल्याने येथील नागरिकांनी याची माहिती पनवेल शहर पोलिसांना दिली. पनवेल शहर पोलीस घटनास्थळी दाखल होत त्यांनी त्या नवजात अर्भकाला ताब्यात घेतले आणि रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी पोलिसांनी एक महिला आणि एका पुरुषाला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २८ जून रोजी पहाटे एक महिला बास्केटमध्ये नवजात अर्भकाला सोडून गेली. त्यानंतर येथील नागरिकांना ते बाळ दिसल्यानंतर त्यांनी या बाळाला रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल केला. बाळासोबत एक चिठ्ठी देखील सापडली होती. त्यामुळे या घटनेचे गांभीर्य वाढले. त्यानंतर पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. २४ तासाच्या आत पोलिसांनी यातील आरोपींना ताब्यात घेतले. यात एक महिला आणि एक पुरुष असून प्रेम संबंधातून हा प्रकार घडला असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.