मुंबई : मुंबईतील रस्ते घोटाळ्यात नाव असलेल्या एका कंत्राटदाराशी भागिदारी असल्याचा आरोप ग्रामविकास तसेच महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांच्यावर झाल्यानंतर गुरुवारी विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला. या गदारोळात कामकाज चारवेळा स्थगित करण्यात आले.या घोटाळ्याशी आपला वा आपले पती चारुदत्त यांचा कुठलाही संबंध नाही. आपल्यावर याबाबत आरोप करणाऱ्यांवर आपण सभागृहात हक्कभंगाचा प्रस्ताव आणू, असा इशारा पंकजा मुंडे यांनी दिला. काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी हा आरोप केला होता. सुप्रा मीडिया कंपनी ही आपले पती चारूदत्त पालवे यांची कंपनी आहे. सुप्रा कंपनीने आरपीएस कंपनीसोबत २०१२ मध्ये जाहिरातविषयक करार केला. केवळ कंपनीच्या जाहीरातीपुरताच हा करार होता. २०१३ ते २०१६ या काळात आमची या कंपनीशी एका पैशाचीही देवाण-घेवाण झालेली नाही. माझे पती कोणत्याही रस्ते कंत्राटात सहभागी नाहीत. आरएसपी कंपनी जर कोणती कामे करत असेल तर त्यांच्याशी आमचा काहीही संबंध नाही. माझे पती १० ते १२ वर्षांपासून व्यवसाय करतात. मी मंत्री झाले म्हणून माझ्या पतीने व्यवसाय बंद करायचा का, असा सवालही पंकजा यांनी केला.>मुख्यमंत्र्यांनी सुनावलेपंकजा मुंडे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहत स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रौद्र रूप धारण केले. ते म्हणाले की, कोणताही पुरावा नसताना अशी बदनामी सुरू ठेवणे योग्य नाही. वृत्तपत्रात आलेल्या बातम्यांच्या आधारे आरोप होत असतील तर मी स्वत:च या बाबत हक्कभंग आणेन, असा इशारा त्यांनी दिला.>मुख्यमंत्र्यांकडून धमकीमंत्र्यांवरील आरोप मान्य करायचे नाहीत आणि त्यांचा बचाव करीत क्लीनचिट देण्याचा अजब प्रकार मुख्यमंत्र्यांनी चालविला आहे. विरोधकांनी एखादा आरोप केल्यानंतर त्यावर हक्कभंग आणण्याची धमकी देणारे, हे पहिलेच मुख्यमंत्री असल्याची टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
पंकजा मुंडेंवरील आरोपांवरून गदारोळ
By admin | Updated: August 5, 2016 01:32 IST