पंचाहत्तरीतही ‘साधू’ गाजवतोय तमाशाचा फड!
By Admin | Updated: June 2, 2014 05:50 IST2014-06-02T05:50:59+5:302014-06-02T05:50:59+5:30
माशाची कला जिवंत ठेवण्याची साधू व आत्मा (आत्मा आता हयात नाहीत) यांची जिद्द निश्चितच कौतुकास्पद. रंगमंचावर टाळ्यांची

पंचाहत्तरीतही ‘साधू’ गाजवतोय तमाशाचा फड!
प्रताप बडेकर, कासेगाव (सांगली) - वय वाढत चालले की, अंगातील शक्ती क्षीण होऊन काम करण्याचा उत्साह कमी होतो, असे म्हणतात़ मात्र, वयाची पंचाहत्तरी गाठूनही वाळवा तालुक्यातील कासेगाव येथील नटसम्राट साधू कासेगावकर आजही तितक्यात जोमाने तमाशात फड गाजवतोय़ आतापर्यंत ‘साधू आणि आत्मा कासेगावकर’ या चुलत भावांच्या जोडगोळीने संपूर्ण महाराष्ट्र गाजवला आहे. तब्बल १० हजारांवर तमाशाचे प्रयोग करून त्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले आहे. तमाशाची कला जिवंत ठेवण्याची साधू व आत्मा (आत्मा आता हयात नाहीत) यांची जिद्द निश्चितच कौतुकास्पद. रंगमंचावर टाळ्यांची, तर शासनदरबारी पुरस्कार-मानधनाची दाद मिळणे एवढेच कलाकारास पुरेसे असते, ही त्यांची भावना. दोघांचाही जन्म खेडेगावातील. लहानपणापासूनच तमाशा कलाप्रकाराबाबत विलक्षण आवड आणि आकर्षण. शिक्षण फक्त तिसरीपर्यंत! लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची प्रेरणा घेऊन तमाशा कला जपण्याचे ठरवले. काही तरी वेगळे करून दाखवायचे म्हणून दोर वळणे, झाडू बनवणे हा पिढीजात धंदा बाजूला सारला. दोघांनीही रियाज सुरू केला. त्यातूनच मग ‘साधू-आत्मा कासेगावकर’ हा तमाशाचा फड उभा राहिला. स्थानिक कलाकारांची जुळवाजुळव करून ७५ कलाकारांचा ताफा तयार झाला. सुरुवातीला गाववार यात्रा, उत्सवात कार्यक्रम होऊ लागले आणि १९७६ मध्ये तंबूमधील तमाशाचा फड सुरू केला. हा तंबूचा फड घेऊन सलग १० वर्षे संपूर्ण महाराष्ट्र त्यांनील पालथा घातला़ कालांतराने आर्थिक अडचण भासू लागली. त्या वेळी काळू-बाळूची जोडी लोकप्रिय होती. काळू-बाळू यांनी साधू-आत्मा यांना आपल्या तमाशात काम करण्यासाठी आमंत्रित केले. त्यानंतर, त्यांनी मागे वळून पाहिले नाही. काळू-बाळू, छबू नगरकर, रावसाहेब आकलेकर, शंकर कुलट, चंद्रकांत महाडिक, रोशनबाई सातारकर यांचे लोकनाट्य तमाशे गाजवले. हळूहळू आर्थिक घडी बसू लागली. त्यानंतर, नव्या उमेदीने तमाशाचा फड पूर्ववत उभा केला. भंडारा, नागपूर, अमरावती, पुणे, मुंबई, विजापूर, बेळगाव, नांदेड येथे कार्यक्रम केले. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत घेण्यात येणार्या महोत्सवात आजअखेर १२ वेळा प्रतिनिधित्व करण्याची संधी ‘साधू-आत्मा’ या जोडीला लाभली आहे. ‘यम’, ‘क्रांतिवीर उमाजी नाईक’, ‘संभाजी घोरपडे’, ‘१८५७ चा दरोडा’, ‘महाराणा प्रताप’ या वगनाट्यांतील साधू-आत्माच्या भूमिकांना रसिकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले. याची दखल घेऊन राज्य शासनाने २०१०-११ मध्ये ‘विठाबाई नारायणगावकर स्मृती लोककला जीवन गौरव पुरस्कार’ देऊन गौरव केला. आज आत्मा कासेगावर हयात नाहीत, परंतु साधू कासेगावकर वयाच्या पंचाहत्तरीतही तरुणांना लाजवेल, अशी मेहनत घेऊन तमाशाची कला जोपासत आहेत. तीन मुलांपैकी मुरार आणि बाजीराव हे तमाशा फडामध्ये मदत करतात, तर तिसरा मुलगा पोपट प्राध्यापक आहे.