पंचगंगा नदी तुडुंब ! कोल्हापूर, सांगली, पंढरपूरला पूरस्थिती; अहिल्यानगर-दौंड वाहतूक ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 13:53 IST2025-08-22T13:52:59+5:302025-08-22T13:53:13+5:30
कोल्हापूर जिल्ह्यातील आलेल्या पूरामुळे रत्नागिरी महामार्ग ठप्प झाला होता

पंचगंगा नदी तुडुंब ! कोल्हापूर, सांगली, पंढरपूरला पूरस्थिती; अहिल्यानगर-दौंड वाहतूक ठप्प
लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर/अहिल्यानगर/सोलापूर : पंचगंगा आणि कृष्णेला आलेल्या पुरामुळे कोल्हापूर आणि सांगली शहरातील पूरस्थिती गंभीर झाली असून, नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडून शहरात व शेतात घुसले आहे. कोल्हापूर ते रत्नागिरी हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. इकडे भीमा नदीला आलेल्या पुरामुळे सिद्धटेक (जि. अहिल्यानगर) ते दौंड हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. भीमा नदीत सुमारे पावणेदोन लाख क्युसेकचा विसर्ग सोडण्यात आल्याने पंढरपुरात पूरस्थिती निर्माण झाली आहे.
उजनी धरणातून सायंकाळी ६ वाजता १ लाख ५१ हजार ६०० क्युसेक, तर वीर धरणातील विसर्ग कमी करून १५ हजार ३२४ क्युसेक करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या धरणातून १ लाख ६७ हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे. पंढरपुरात १ लाख ४६ हजार क्युसेकचा, तर संगम येथे १ लाख ९५ हजारांचा विसर्ग सुरू आहे. पंढरपुरात रात्री विसर्ग वाढल्याने व्यासनारायण बरोबर अंबाबाई पटांगणनगर झोपडपट्टीत पाणी शिरले आहे. प्रशासनाने १३७ संभाव्य बाधित कुटुंबांचे स्थलांतर केले असून, आणखी १०० कुटुंबांचे स्थलांतर करण्यात येणार आहे.
पंचगंगा धोक्याच्या वर
पंचगंगा नदीची पातळी दिवसभरात फुटाने वाढली असून, सध्या ४३.०५ फुटांवरून वाहत आहे. जिल्ह्यातील ९३ मार्ग पाण्याखाली असल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. कोल्हापूर ते गगनबावडा व कोल्हापूर ते रत्नागिरी हे तळकोकणाला जोडणाऱ्या दोन्ही मार्गावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प आहे. कोयना धरणात २४ तासांत सुमारे साडेसहा 3 टीएमसी पाणी आवक झाली. त्यातच आवक कमी झाल्याने कोयनेचे सहा दरवाजे १३ वरून ११ फुटांपर्यंत खाली घेऊन विसर्ग सुरू ठेवण्यात आलेला आहे. सध्या कृष्णा नदीची पाणीपातळी सांगली आयर्विन पूल येथे ४३ फूट झाली आहे. भीमा नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत असल्याने सिद्धटेक-दौड संपर्क तुटला आहे.