पानसरे हत्येचे चारशे पानी पुरवणी दोषारोपपत्र दाखल; चौघांचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 01:53 AM2019-02-12T01:53:05+5:302019-02-12T01:53:55+5:30

ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्याप्रकरणी आजअखेर केलेल्या तपासाचे ४०० पानी पुरवणी दोषारोपपत्र ‘एसआयटी’ने प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. राऊळ यांच्याकडे सोमवारी दाखल केले.

Panasare murder; Allegations of the involvement of the four | पानसरे हत्येचे चारशे पानी पुरवणी दोषारोपपत्र दाखल; चौघांचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचा आरोप

पानसरे हत्येचे चारशे पानी पुरवणी दोषारोपपत्र दाखल; चौघांचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचा आरोप

Next

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्याप्रकरणी आजअखेर केलेल्या तपासाचे ४०० पानी पुरवणी दोषारोपपत्र ‘एसआयटी’ने प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. राऊळ यांच्याकडे सोमवारी दाखल केले.
आरोपपत्रामध्ये संशयित अमोल काळे (वय ३५, रा. पिंपरी-चिंचवड), वासुदेव सूर्यवंशी (२९, रा. जळगाव), भरत कुरणे (३७, रा. बेळगाव), अमित डेगवेकर (३८, रा. दोडामार्ग, सिंधुदुर्ग) या चौघांचा पानसरे हत्येमध्ये प्रत्यक्ष सहभाग असून खून, खुनाचा प्रयत्न, साक्षीदारांच्या मदतीने हत्येचा
कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. सुमारे ८५ साक्षीदारांचे जबाब घेतले आहेत.
विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी एसआयटीचे तपास अधिकारी तथा अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्याकडून दोषारोपपत्र न्यायालयासमोर सादर केले.
आजपर्यंत केलेल्या तपासाचा पुरवणी अहवाल एसआयटीने यापूर्वी उच्च न्यायालयात सादर केला आहे. पुरवणी दोषारोपपत्रामध्ये चौघा संशयितांकडून काही महत्त्वाचे पुरावे हाती लागले असून, ते पुराव्यानिशी न्यायालयासमोर सादर केले आहेत. हा संपूर्ण तपास गोपनीय आहे.
तपासाबाबत उलट-सुलट चर्चा
संशयित तावडेने कुरणेकडे पिस्तूल दिले. त्याने ते बेळगावला नेऊन नष्ट केले; तर सूर्यवंशी याने मोटारसायकलींची विल्हेवाट लावल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तपासामध्ये संशयितांकडून पिस्तूल आणि दुचाकी हस्तगत झाली नाही. पानसरे हत्येमध्ये गोळ्या झाडल्याचा आरोप सनातन संस्थेचे साधक विनय बाबूराव पवार (रा. उंब्रज, जि. सातारा) व सारंग दिलीप अकोळकर (रा. चिंतामणी अपार्टमेंट, पुणे) यांच्यावर केला आहे. दोघेही फरार आहेत. आतापर्यंत या गुन्ह्यात आठ आरोपी निष्पन्न झाले आहेत. त्यापैकी सहाजणांना अटक केली.

दोष सिद्ध झाल्यास शिक्षा
संशयितांच्या विरोधात १२० (ब), कट रचणे, १०९ मदत करणे, ३०२ खुनाचा प्रयत्न, संगनमत करणे (३४), यासह बेकायदेशीर घातक शस्त्रे जवळ बाळगल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. संशयितांवर दोष सिद्ध झाल्यास आजन्म कारावास किंवा फाशीची शिक्षा होऊ शकते, असे अ‍ॅड. राणे यांनी सांगितले.

Web Title: Panasare murder; Allegations of the involvement of the four

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.