लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 16:45 IST2025-12-13T16:33:33+5:302025-12-13T16:45:57+5:30
पालघरमध्ये अल्पवयीन आदिवासी मुलींची विक्री होत असल्याची तक्रार राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
CM Devendra Fadnavis: मुंबईजवळच्या पालघर जिल्ह्यातून महाराष्ट्राला हादरवून टाकणारी एक धक्कादायक सामाजिक समस्या समोर आली आहे. जेथे मुलींनी खेळायला, शाळेत जायला हवे, त्या कोवळ्या वयात त्यांची केवळ काही हजार रुपयांसाठी विक्री केली जात आहे. अल्पवयीन आदिवासी मुलींना लग्नाच्या नावाखाली विकण्याचा हा भयावह प्रकार उघडकीस आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या प्रकरणाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या प्रकरणावर भाष्य केले आहे.
नोकरी नसलेल्या तरुणांसाठी काही एजंट्स पालघरच्या आदिवासी पाड्यांमध्ये सक्रिय झाले आहेत. हे एजंट नवरदेवाकडून लाखो रुपयांची मोठी रक्कम घेतात. याच एजंट्सकडून पालघरमधील गरीब आदिवासी कुटुंबांना केवळ ४०,००० ते ५०,००० देऊन त्यांच्या मुलींचा सौदा केला जातो. मुलगा चांगला कमवतो आणि तुमची मुलगी सुखी होईल,' अशी खोटी आश्वासने देऊन अशिक्षित आदिवासी कुटुंबांची फसवणूक केली जाते. दारिद्र्यामुळे हतबल झालेले पालक आपली मुलगी कोणाला देत आहेत, तिचा नवरा कुठे राहतो, याची साधी चौकशीही करत नाहीत. एजंट्स केवळ लग्ने लावून देतात आणि त्यानंतर त्या मुलींच्या भविष्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात.
या प्रकरणांची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कठोर कारवाई केली आहे. आरोपींसह या गैरव्यवहारात सहभागी असलेल्या एजंट्सना अटक करण्यात आली असून, पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध न्यायालयात चार्जशीट दाखल केली आहे.
बेपत्ता मुलांच्या वाढत्या संख्येवर राज ठाकरे संतप्त
पालघरमधील या विक्रिसत्राच्या पार्श्वभूमीवर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यात लहान मुले बेपत्ता होण्याच्या वाढत्या प्रमाणावर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भात पत्र लिहून सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. राष्ट्रीय गुन्हे अभिलेख विभागाच्या आकडेवारीनुसार, सन २०२१ ते २०२४ या काळात लहान मुले बेपत्ता होण्याचे प्रमाण सुमारे ३० टक्क्यांनी वाढले आहे, या वस्तुस्थितीकडे राज ठाकरे यांनी लक्ष वेधले आहे.
मुख्यमंत्र्यांनी दिले आकडेवारीसह उत्तर
राज ठाकरे यांच्या पत्रावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्वरित प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी पत्र सविस्तर वाचले नसले तरी, बेपत्ता मुलींच्या आकडेवारीवर त्यांनी स्पष्टीकरण दिले. मी अजून पत्र वाचलेलं नाही, पण बेपत्ता होणाऱ्या मुलींसंदर्भात आकडेवारी सहित त्याची कारणं दिली आहेत. परत किती येतात हेही सांगितलेलं आहे. एखादी मुलगी घरून भांडून गेली आणि ती तीन दिवसांत परत आली तरी तिची बेपत्ता म्हणून तक्रार नोंदवली जाते. यामुळे बेपत्ता झालेल्यांची संख्या मोठी दिसते. आम्ही वर्षभरात ९० टक्क्यांहून अधिक मुलींना परत आणण्यात यशस्वी होतो. उर्वरित मुली पुढील वर्ष-दीड वर्षात परत येतात," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दरम्यान, पत्र वाचल्यानंतर राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक शंकेला योग्य उत्तर देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहे.