पालघर पोटनिवडणूक रद्द
By Admin | Updated: June 3, 2015 03:54 IST2015-06-03T03:54:15+5:302015-06-03T03:54:15+5:30
शिवसेनेचे आमदार कृष्णा अर्जुन घोडा यांच्या निधनामुळे रिक्त झालेली जागा भरण्यासाठी महाराष्ट्र विधानसभेची येत्या २७ जून रोजी जाहीर केलेली

पालघर पोटनिवडणूक रद्द
मुंबई : शिवसेनेचे आमदार कृष्णा अर्जुन घोडा यांच्या निधनामुळे रिक्त झालेली जागा भरण्यासाठी महाराष्ट्र विधानसभेची येत्या २७ जून रोजी जाहीर केलेली पोटनिवडणूक निवडणूक आयोगाने रद्द केली आहे.
या पोटनिवडणुकीची घोषणा आयोगाने २९ मे रोजी केली होती. मात्र घोडा यांच्या निवडीस आव्हान देणारी पराभूत उमेदवार राजेंद्र धेड्या गावित यांनी केलेली निवडणूक याचिका मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहे, असे निदर्शनास आणून दिल्यानंतर आता पालघरची पोटनिवडणूक जाहीर करणारी अधिसूचना रद्द करण्यात येत असल्याचे पत्रक आयोगाने जारी केले. परिणामी, पालघर मतदारसंघात आता २७ जून रोजी पोटनिवडणूक होणार नाही. दरम्यान, ज्या याचिकेमुळे ही पोटनिवडणूक रद्द झाली आहे ती याचिका ११ जून रोजी न्या. नितीन जामदार यांच्यापुढे सुनावणीस यायची आहे. पोटनिवडणूक घ्यायची की नाही व घ्यायची तर केव्हा घ्यायची हे त्यानंतरच ठरेल. (विशेष प्रतिनिधी)