एकनाथ खडसेंच्या छातीत वेदना; खबरदारी म्हणून उपचारासाठी मुंबईला आणणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2023 16:33 IST2023-11-05T15:58:49+5:302023-11-05T16:33:20+5:30
राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांना सकाळी अस्वस्थ वाटत होते.

एकनाथ खडसेंच्या छातीत वेदना; खबरदारी म्हणून उपचारासाठी मुंबईला आणणार
जळगाव – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांना मुंबईत उपचारासाठी आणले जात आहे. खडसे नियमित तपासणीसाठी डॉक्टरांकडे गेले होते. परंतु खडसेंच्या छातीत वेदना होत असल्याने खबरदारी म्हणून त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणलं जात आहे.
खडसेंच्या प्रकृतीची बातमी कळताच त्यांच्यासाठी एअर अॅम्ब्युलन्सची व्यवस्था करण्याचे आदेश मुख्योमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री शिंदे त्यांच्या मूळगावी फेरफटका मारताना त्यांना खडसेंच्या तब्येतीबाबत माहिती समजली. राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांना सकाळी अस्वस्थ वाटत होते. परंतु त्यांची तब्येत आता ठीक आहे. खबरदारी म्हणून एकनाथ खडसेंना पुढील उपचारासाठी जळगावहून मुंबईला आणले जाणार आहे अशी माहिती खडसेंच्या कुटुंबियांनी दिली आहे.
खडसेंवर उपचार करणारे डॉक्टर विवेक चौधरी म्हणाले की, गेल्या २ दिवसांपासून एकनाथ खडसे यांच्या छातीत वेदनेचा त्रास होत होता. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईला हलवण्यात येत आहे.