पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 05:38 IST2025-04-26T05:37:31+5:302025-04-26T05:38:23+5:30

देश सोडून जाताहेत की नाही, यावर पोलिसांची करडी नजर

Pahalgam Terror Attack: Watch on Pakistani citizens in Maharashtra; Chief Minister Devendra Fadnavis orders police | पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश

पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश

मुंबई - पहलगामधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतातील पाकिस्तानी नागरिक पाकिस्तानात परत गेले की नाही यावर पोलिसांची बारीक नजर असून प्रत्येक पोलिस ठाण्याला त्याबाबत आदेश देण्यात आले आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पत्रकारांना सांगितले. 

ते म्हणाले, पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे त्यांना तत्काळ पाकिस्तानला परत जावे लागेल.  राज्यात किती पाकिस्तानी नागरिक आहेत याची नावांसह यादी आमच्याकडे तयार आहे. निर्धारित वेळेत ते देश सोडून गेले की नाही याची शहानिशा केली जात आहे. कोणत्याही परिस्थितीत हे पाकिस्तानी नागरिक महाराष्ट्रात राहणार नाहीत हे बघितलेच जाईल तरीही कोणी इथे राहिला असल्याचे निदर्शनास आले तर तत्काळ कारवाई केली जाईल. 

कोणताही पाकिस्तानी नागरिक ४८ तासांपेक्षा अधिक काळ महाराष्ट्रात राहू नये, याची काळजी घेतली जात आहे. या संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवली जात असून, जो कुणी अधिक काळ वास्तव्य करताना आढळेल, त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा झाली असून, त्यांनी दिलेल्या दिशानिर्देशांनुसारच ही कारवाई होईल. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री    

बैठकीत गैरहजर उद्धवसेनेवर टीका 
उद्धवसेनेचा एकही नेता/ खासदार पहलगाममधील घटनेनंतर दिल्लीत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित नव्हता, याबद्दल फडणवीस यांनी एका प्रश्नात खेद व्यक्त केला. ते म्हणाले की, देशावरील संकटसमयी राजकीय मतभेद बाजूला सारून सगळे एक होतात हा आपल्या देशाचा इतिहास आहे, पण त्याचे भान उद्धवसेनेला दिसत नाही, उलट त्यांचे नेते संवेदनशील विषयांवर वाटेल तसे बोलत आहेत. ‘विमानात कधी बसले नाही अशाही लोकांना आमच्या पक्षाने जम्मू-काश्मीरमधून विमानाने परत आणले, असे विधान शिंदेसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी केले होते. त्यावर, म्हस्के यांचे विधान अयोग्यच होते, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली.   

Web Title: Pahalgam Terror Attack: Watch on Pakistani citizens in Maharashtra; Chief Minister Devendra Fadnavis orders police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.