सांगली - 'काश्मीर खोन्यातील पहलगाम येथे आम्ही पोनी (घोडे) घेणार होतो. मात्र, ऐनवेळी कारने गेलो. आमचा हा निर्णय आम्हाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढणारा ठरला.', असा थरारक अनुभव सांगलीतील पर्यटक संतोष जगदाळे यांनी सांगितला. सांगलीतील ज्यूस विक्रेते असलेले जगदाळे, त्यांची पत्नी, मित्र, व मित्राची पत्नी असे चारजण पहलगामला गेले होते. दहशतवादी हल्ल्याच्या घटनेतून ते कशापद्धतीने थोडक्यात बचावले याची कहाणी समोर आली आहे.
समान नावामुळे गोंधळ; सांगलीच्या घरी धक्का
मंगळवारी दहशतवादी हल्ल्यात पुण्याचे संतोष एकनाथ जगदाळे यांचा मृत्यू झाला.दुसरीकडे सांगलीतून गेलेले संतोष लक्ष्मण जगदाळे हल्ल्यातून बचावले होते. नावात सारखेपणा असल्याने सांगलीच्या संतोष यांच्या घरचे लोक व नातलग यांना मृत्यूच्या त्या वृत्ताने धक्का बसला. संतोष यांनी आपण जिवंत असल्याचे सांगितल्यानंतर साऱ्यांना दिलासा मिळाला.
नेमकं काय घडलं?
काश्मीर दौऱ्यात आमचा ग्रुप आधी पहलगामला रात्री थांबला. सकाळी आम्ही फिरायला निघालो तेव्हा वरती जायला घोडे मिळाले नाहीत. त्यामुळे आम्ही सन टॉप पाहायला गेलो. तिथून परतल्यानंतर आम्हाला हल्ल्याची माहिती मिळाली. चहुबाजूने सैन्याचे जवान तैनात होते. त्यांनी आमची चौकशी केली आणि तिथून सुरक्षित बाहेर काढले. त्यातच टीव्हीवर संतोष जगदाळे यांना गोळी लागल्याने मृत्यू झाल्याची बातमी चालली. या बातमीने कुटुंब आणि नातेवाईक घाबरले. बऱ्याच जणांनी मला वारंवार कॉल करून विचारपूस केली असं संतोष जगदाळे यांनी म्हटलं. गोळीबारात ज्या संतोष जगदाळे यांचा मृत्यू झाला ते पुण्याचे होते. मी सुखरूप असल्याचं ऐकून घरच्यांना दिलासा मिळाला.
दरम्यान, सांगली, मिरज तसेच जिल्ह्यातील काही ट्रॅव्हल कंपन्यांकडून गेलेले पन्नासहून अधिक पर्यटक काश्मीरमध्ये आहेत. २० ते २५ जणांचे मोठे ग्रुप त्याठिकाणी फिरत आहेत. बैसरन भाग सोडून अन्यत्र पर्यटन करण्यावर आता भर दिला जात आहे. पुढील पंधरा दिवसांत तसेच महिन्याभरात ज्यांनी काश्मीरसाठी ट्रॅव्हल कंपन्यांकडून पॅकेज निश्चित केले होते, त्यांनी दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरचा बेत बदलला आहे.