पाडगावकरांनी मराठी साहित्य आणि संस्कृती मोठी केली - राज ठाकरे
By Admin | Updated: December 30, 2015 15:39 IST2015-12-30T12:00:40+5:302015-12-30T15:39:49+5:30
आपल्या कवितांमधून जगण्याची प्रेरणा देणारे महान कवी मंगेश पाडगावकर यांच्या निधनाबद्दल साहित्य, राजकीय क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

पाडगावकरांनी मराठी साहित्य आणि संस्कृती मोठी केली - राज ठाकरे
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३० - आपल्या कवितांमधून जगण्याची प्रेरणा देणारे महान कवी मंगेश पाडगावकर यांच्या निधनाबद्दल साहित्य, राजकीय क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्राला प्रेम शिकविणारा कवी हरपला, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. पाडगावकरांच्या निधानावर साहित्य आणि राजकीय क्षेत्रातून व्यक्त झालेल्या भावना.
लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांवर आपल्या कविता मनमुराद उधळणारा पाडगावकरांसारखा दुसरा कवी मराठीत नाही. मराठी साहित्य आणि मराठी संस्कृती त्यानं मोठी झाली. त्यामुळे आमचं जगणही समृद्ध झालं. त्यांनी 'उदासबोध' या काव्यसंग्रहातून राजकारण्यांना मारलेले फटकेही मोलाचे आहेत. मराठी साहित्य आणि मराठी माणूस मोठा करणारा हा कवी. त्यांना माझी आणि माझ्या पक्षाची भावपूर्ण श्रध्दांजली - मनसे अध्यक्ष राज ठाकरे
मराठी मनात कविता रुजवणारा कवी हरपला - कवी अशोक नायगावकर
महाराष्ट्राला प्रेम शिकवणारे,जीवनगाणे देणारे महान कवी मंगेश पाडगावकरांच्या निधनाने साहित्याची अपरीमित हानी झाली आहे - अजित पवार
अनेक अजरामर गाण्यांचे गीतकार व अत्यंत साध्या व लाघवी व्यक्तीमत्वाचे धनी कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या दु:खद निधनाची बातमी ऐकून मला अतिशय दु:ख झाले. माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना - गानसम्राज्ञी लता मंगेशकर
आबालवृद्धांच्या मनावर अधिराज्य करणारा कवी हरपला, ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली - राधाकृष्ण विखे-पाटील
मराठीला आपल्या कवितांनी चिरतरूण करणाऱ्या कवी मंगेश पाडगावकर यांच्या निधनाने साहित्यविश्वाची मोठी हानी झाली आहे. भावपूर्ण श्रद्धांजली - सुनील तटकरे
सांगा कसं जगायचं? कण्हत कण्हत की गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा! : कविवर्य मंगेश पाडगांवकर. विनम्र आदरांजली! - खासदार पूनम महाजन
"बोलगाणी अबोल झाली" कविवर्य मंगेश पाडगावकर यांना अखेरचा सलाम! - आशिष शेलार
केवळ कविताच नाही, तर अवघ्या साहित्य विश्वाला समृद्ध करणाऱ्या एका प्रतिभावान आणि थोर साहित्यिकाला आज महाराष्ट्र मुकला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मंगेश पाडगावकर यांच्या निधनामुळे मराठी साहित्यात भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे - शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष
मंगेश पाडगावकर मराठीतील थोर साहित्यिक होते, त्यांच्या कविता, लेखनाचा अनेकांवर प्रभाव पाडला. त्यांच्या निधनाच्या बातमीने दु:ख झाले - पंतप्रधान नरेंद्र मोदी