Padalkar Awhad News : आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात बुधवारी झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर गुरुवारी हा वाद आणखी विकोपाला गेला. जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्याला गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी विधान भवनाच्या प्रवेशद्वारातच पकडून मारहाण केली. आव्हाडांचा कार्यकर्ता नितीन देशमुख यांना मारहाण करणाऱ्या पडळकरांच्या कार्यकर्त्याचे नाव आहे ऋषिकेश टकले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
नितीन देशमुखांना ज्या कार्यकर्त्याने मारहाण केली, तो ऋषिकेश टकले मूळचा सांगली जिल्ह्यातील आहे. सांगली जिल्ह्यात असलेल्या पलूसचा आहे. तो गोपीचंद पडळकर यांचा कार्यकर्ता आहे. या वादानंतर पडळकर यांनीही तो माझा कार्यकर्त्या असल्याचे मान्य केले आहे.
ऋषिकेश टकले कोण आहे?
हिंदुस्थान शिव मल्हार संघटना आहे, त्या संघटनेचा ऋषिकेश टकले हा सांगली जिल्हाध्यक्ष आहे. पलूस तालुक्यातील पाचवा मैल येथे तो राहतो. मागील दोन ते तीन वर्षांपासून तो गोपीचंद पडळकरांसोबतच असतो. पडळकरांचा कट्टर कार्यकर्ता अशी त्याची ओळख आहे.
ऋषिकेश टकले याला गुन्हेगारी पार्श्वभूमीही आहे. पलूस ठाण्यात त्याच्याविरोधात २०१३ मध्ये मारामारी आणि इतर गुन्हे दाखल आहेत. २०२१ मध्ये भिलवडी पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात विनयभंग, मारामारी, सरकारी कामात अडथळा आणणे, गंभीर दुखापत करणे, हत्येचा प्रयत्न असे गंभीर गुन्हेही दाखल आहेत.
जितेंद्र आव्हाडांनी असाही दावा केला आहे की, ऋषिकेश टकले याच्या विरोधात मकोकाचा गुन्हाही दाखल आहे.
नितीन देशमुख कोण?
नितीन देशमुख हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे कार्यकर्ते आहेत. ते घाटकोपर भागात राजकारणात सक्रीय आहेत. १५ वर्षांपासून ते राष्ट्रवादीत असून, जितेंद्र आव्हाडांचा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे.
गोपीचंद पडळकर-जितेंद्र आव्हाड वाद कसा सुरू झाला?
दोन दिवसांपूर्वी आमदार जितेंद्र आव्हाड विधानभवनाबाहेर उभे होते. त्यावेळी गोपीचंद पडळकरांची गाडी आली. पडखळकरांनी गाडीचा दरवाजा जोरात ढकलला. तो जितेंद्र आव्हाडांच्या पायाला लागला. त्यावरून तिथे बाचाबाची झाली. यावेळी तिथे असलेल्या नितीन देशमुख आणि गोपीचंद पडळकर यांच्यात शिवीगाळही झाली. त्यानंतर हा वाद आणखी वाढला आणि गुरुवारी हाणामारी झाली.