पाचपुते यांची राष्ट्रवादीला अखेर सोडचिठ्ठी काका-पुतण्यांवर टीका
By Admin | Updated: August 16, 2014 03:05 IST2014-08-16T03:05:02+5:302014-08-16T03:05:02+5:30
माजी मंत्री आ. बबनराव पाचपुते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अखेर सोडचिठ्ठी दिली

पाचपुते यांची राष्ट्रवादीला अखेर सोडचिठ्ठी काका-पुतण्यांवर टीका
श्रीगोंदा (जि. अहमदनगर) : माजी मंत्री आ. बबनराव पाचपुते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अखेर सोडचिठ्ठी दिली. श्रीगोंदा येथे शुक्रवारी झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पक्ष सोडल्याचे त्यांनी जाहीर केले. या वेळी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली. आगामी विधानसभा अपक्ष अथवा भाजपाच्या तिकिटावर लढण्याचा कार्यकर्त्यांनी मेळाव्यात निर्धार केला.
आ. पाचपुते म्हणाले, २००४च्या विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर युतीच्या नेत्यांनी चार आमदार घेऊन या, तुम्हाला मुख्यमंत्री करतो, अशी आॅफर दिली होती. परंतु शरद पवारांना आपण पाठिंबा दिला. मला वनमंत्री, आदिवासी मंत्री केले, परंतु मनासारखे खाते दिले नाही. गृहराज्यमंत्री केले आणि दीड वर्षात घरी पाठविले. जे नेते काहीच करीत नाहीत, त्यांना १५-१५ वर्षे मंत्री ठेवले. मी काका-पुतण्यांना कुकडीचे पाणी, रस्त्यासंदर्भात अडचणी सांगितल्या. त्यांना १५ दिवसांपूर्वी भेटलो. माझी त्यांनी अवहेलना केली. मी पक्ष सोडणार अशी चर्चा त्यांच्या कानावर गेली, परंतु त्यांनी मला साधा फोनसुद्धा केला नाही, याचे मला दु:ख झाले. मी लोकसभा निवडणुकीत राजीव राजळे यांचे जबाबदारीने काम केले. वास्तव परिस्थिती समजून न घेता पालकमंत्री मधुकर पिचड यांच्या सांगण्यावरून मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. (तालुका प्रतिनिधी)